‘The Apprentice’ At Cannes: डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवनावर आधारीत 'द अप्रेंटिस'ला कान्समध्ये आठ मिनिटांचे स्टँडिंग ओव्हेशन; मात्र एका सीनमुळे नव्या वादाला सुरुवात, जाणून घ्या सविस्तर
हा चित्रपट कान्समध्ये पहिल्यांदा प्रदर्शित झाला, मात्र त्याच्या जगभरातील प्रदर्शनाची तारीख अद्याप ठरलेली नाही.
‘The Apprentice’ At Cannes: एकीकडे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची सिक्रेट मनी ट्रायल न्यूयॉर्कमध्ये 6 आठवड्यांपासून सुरू आहे, तर दुसरीकडे रिपब्लिकन पक्षाचे देशाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार असलेले ट्रम्प यांच्या जीवनावर आधारीत एका चित्रपटाचा सोमवारी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर झाला. या चित्रपटात 1980 च्या दशकातील ट्रम्पची तीक्ष्ण प्रतिमा सादर करण्यात आली आहे. इराणी-डॅनिश चित्रपट निर्माते अली अब्बासी दिग्दर्शित 'द अप्रेंटिस'मध्ये (The Apprentice) सेबॅस्टियन स्टॅनने ट्रम्पची भूमिका केली आहे. हा चित्रपट कान्समध्ये पहिल्यांदा प्रदर्शित झाला, मात्र त्याच्या जगभरातील प्रदर्शनाची तारीख अद्याप ठरलेली नाही. या चित्रपटाला कान्समध्ये 8 मिनिटे स्टँडिंग ओव्हेशन मिळाले. परंतु आता या चित्रपटातील एका सीनमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
चित्रपटाच्या एका दृश्यात, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांची पहिली पत्नी इव्हाना हिच्यावर बलात्कार करणारा, ‘बलात्कारी’ म्हणून दाखवण्यात आले आहे.
पहा व्हिडिओ-
या दृश्यात, ट्रम्पची भूमिका साकारणारा सेबॅस्टियन त्याची तत्कालीन पत्नी इव्हाना म्हणजेच मारिया बाकालोव्हा हिला जमिनीवर फेकतो. यानंतर तो तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतो, असे दाखवण्यात आले आहे. एका महिलेने चित्रपटातील हे दृश्य अतिशय वाईट आणि घृणास्पद असल्याचे वर्णन केले आहे, तसेच हा एक बलात्कार असल्याचेही सांगितले. दुसऱ्या महिला सहभागीने याला सहमती दर्शवत हा एक लैंगिक अत्याचार असल्याचे म्हटले. आता या चित्रपटाबाबत न्यायालयीन खटला दाखल करणार असल्याचे ट्रंप यांच्या प्रतिनिधींनी सांगितले आहे. (हेही वाचा: Cannes Film Festival 2024: 'मंथन' च्या स्क्रिनिंगनंतर नसीरुद्दीन शाह यांना कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्टँडिंग ओव्हेशन)
रेप सीनवरून वाद-
खऱ्या आयुष्यात ही घटना घडल्यानंतर सुरुवातीला इव्हाना यांनी या घटनेचा उल्लेख बलात्कार म्हणून केला होता, परंतु नंतर त्यांनी हा दावा मागेही घेतला होता. दरम्यान, 1970 च्या दशकापासून ट्रम्प यांच्यावर अनेक लैंगिक गैरवर्तनाचे आरोप असूनही, त्यांनी सर्व नाकारले. 1990 च्या दशकाच्या मध्यात लेखक ई. जीन कॅरोल यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल त्यांना गेल्या वर्षी जबाबदार धरण्यात आले आणि त्यांना $83.3 दशलक्ष नुकसान भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला.