Films to watch in 2020: यंदा प्रदर्शित होणाऱ्या 'या' बॉलिवूड चित्रपटांची यादी तुम्हाला माहित आहेत का? पाहा कोणत्या चित्रपटात रंगणार चुरस

पुढील आठवड्यापासून बॉलिवूडमध्ये अनेक दमदार चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यात अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश असणार असून यात बायोपिक, मनोरंजन तसेच विनोदी चित्रपटांचा समावेश असणार आहे. विशेष म्हणजे यातील काही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. यंदा ईदच्या दिवशी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि सलमान खान यांचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तसेच ख्रिसमसमध्ये अक्षय कुमार आणि आमिर खान यांच्या चित्रपटांची लढत होणार आहे.

(PC- instagram, facebook, wikipedia)

Films to watch in 2020: 1 जानेवारीपासून नवीन वर्षाला सुरूवात झाली आहे. पुढील आठवड्यापासून बॉलिवूडमध्ये अनेक दमदार चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यात अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश असणार असून यात बायोपिक, मनोरंजन तसेच विनोदी चित्रपटांचा समावेश असणार आहे. विशेष म्हणजे यातील काही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. यंदा ईदच्या दिवशी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि सलमान खान यांचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तसेच ख्रिसमसमध्ये अक्षय कुमार आणि आमिर खान यांच्या चित्रपटांची लढत होणार आहे. त्यामुळे आता या चित्रपटांपैकी कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज या लेखातून 2020 या वर्षात कोणता चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची माहिती जाणून घेऊयात.

'छपाक' आणि 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' -

पुढील आठवड्यात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोनचा 'छपाक' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातून दीपिका निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवत आहे. या दिवशी म्हणजे 10 जानेवारीला 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' चित्रपटही प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अजय देवगन तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे या दोन चित्रपटांपैकी कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (हेही वाचा - अनुराधा पौडवालच आपली आई असल्याचा केरळच्या महिलेचा दावा; 50 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी)

'स्ट्रीट डान्सर 3D', 'पंगा' -

येत्या 24 जानेवारीला वरुण धवन, श्रद्धा कपूर, नोराह फतेही यांची प्रमुख भूमिका असलेला 'स्ट्रीट डान्सर 3 डी' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी कंगनाचा 'पंगा' हा चित्रपटही प्रदर्शित होत आहे.

लव आज कल सीक्वल -

14 फेब्रुवारीला म्हणजेच 'व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशी बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता कार्तिक आर्यनचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट 'लव आज कल'चा सीक्वल असणार आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना सारा आणि कार्तिकची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.

शुभ मंगल ज्यादा सावधान, गुलाबो सिताबो, रुह अफ्जा -

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि राजकुमार रावचा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' हा चित्रपट फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. तसेच एप्रिल महिन्यात बिग बी अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांची प्रमुख भूमिका असलेला 'गुलाबो सिताबो' हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि अमिताभ बच्चन पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. एप्रिल महिन्यात 17 तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. परंतु, याचवेळी जान्हवी कपूर, राजकुमार रावचा 'रुह अफ्जा' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सूर्यवंशी -

बॉलिवूड स्टार अक्षय कुमार याचा बहुचर्चित 'सूर्यवंशी' हा चित्रपट येत्या मार्च महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी यांनी केलं आहे.

87 -

87 हा चित्रपट भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या पहिल्या वर्ल्ड कपवर आधारित आहे. 10 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यात रणवीर सिंग, दीपिका पादुकोन यांच्यासह अनेक कलाकारांच्या महत्त्वच्या भूमिका आहेत. या चित्रपटामध्ये रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका बजावणार आहे. तर दीपिका पादुकोन कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

कुली नंबर 1 -

हा चित्रपट बॉलिवूड स्टार गोविंदा यांचा 'कुली नंबर 1' या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात सारा अली खान आणि वरुण धवन यांची प्रमुख भूमिका असणार आहे. हा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

लक्ष्मी बॉम्ब, 'पृथ्वीराज' -

यंदा अक्षय कुमारचे 'सूर्यवंशी' आणि 'लक्ष्मी बॉम्ब' हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. 'लक्ष्मी बॉम्ब' या चित्रपटात अक्षय तृतीयपंथीयाची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट ईदला प्रदर्शित होत आहे. याव्यतिरिक्त अक्षय कुमार आणखी एका चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे नाव 'पृथ्वीराज' असे असून हा चित्रपट नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

'सडक 2' -

जुलै महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या 'सडक 2' या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट पहिल्यांदाच आपले वडील महेश भट्ट यांच्यासोबत काम करत आहे. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, संजय दत्त, पूजा भट्ट आदींच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत.

भूज द प्राइड ऑफ इंडिया -

या चित्रपटात अजय देवगन मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 14 ऑगस्ट 2020 ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये 1971 मध्ये भारत- पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धाची पार्श्वभूमी दाखवण्यात आली आहे.

लाल सिंग चड्ढा -

या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची मुख्य भूमिका असणार आहे. हा चित्रपट 'फॉरेस्ट गम्प' या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात आमिरसोबत करिना कपूर मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट डिसेंबर महिन्यात नाताळमध्ये प्रदर्शित होणार आहे.