मुंबई: मोबाईलच्या व्ययत्यामुळे 'लाईव्ह शो' चा रसभंग टाळण्यासाठी BMC नाट्यगृहांमध्ये जॅमर बसवणार?
मात्र जॅमर बसवल्याने इतर काही तांत्रिक गोष्टींचं गणित बिघडू शकतं ही भीती सुमीतने व्यक्त केली आहे.
नाटकाचे प्रयोग, संगीताचे कार्यक्रम यादरम्यान मोबाईल वाजल्याने कलाकार आणि इतर रसिकांचा होणारा रसभंग टाळण्यासाठी आता मुंबई महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये मोबाईल जॅमर बसवण्याची मागणी पुढे आली आहे. शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये 'नॉक नॉक सेलिब्रिटी' या नाट्यप्रयोगाच्या वेळेस मोबाईल फोन वाजल्याने अभिनेता सुमित राघवन याने प्रयोग थांबवला होता. फेसबूकच्या माध्यमातूनही त्याने आपला राग व्यक्त केला होता. या प्रकारानंतर शिवसेनेच्या शीतल म्हात्रे यांनी गंभीर दखल घेत जॅमर बसवण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे.
सुमीत राघवनची प्रतिक्रिया
सुमित राघवन यानेदेखील पालिकेच्या या प्रस्तावाचं कौतुक केलं आहे. मात्र जॅमर बसवल्याने इतर काही तांत्रिक गोष्टींचं गणित बिघडू शकतं ही भीती सुमीतने व्यक्त केली आहे.
सुमित राघवनपूर्वी अनेक ज्येष्ठ कलाकारांनी वारंवार रसिकांना प्रयोगादरम्यान मोबाईल बंद ठेवण्याची विनंती केली होती. आणि तसे न केल्याने प्रयोगही थांबवण्याचे प्रकार घडले आहेत.