Marathi Rangbhumi Din 2024: महाराष्ट्रात आज साजरा होत आहे मराठी रंगभूमी दिन; ‘सीता स्वयंवर’ नाटकाने घातला होता नाट्यसृष्टीचा पाया, जाणून घ्या या दिवसाचे महत्व
म्हणूनच रंगदेवतेची अविरत सेवा करणाऱ्या सर्व थोर कलाकारांना आजच्या दिवशी अभिवादन केले जाते.
महाराष्ट्रात दरवर्षी 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिवस (Marathi Rangbhumi Din 2024) साजरा केला जातो. रंगकर्मी विष्णूदास भावे यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा होतो. विष्णुदास भावे यांनी 1843 साली ‘सीता स्वयंवर’ हे पहिले नाटक रंगभूमीवर सादर करून, मराठी नाट्यसृष्टीचा पाया घातला होता. सांगली संस्थानच्या राजवाड्यातील दरबार हॉलच्या रंगमंचावर 'सीता स्वयंवर' नाटक पार पडले. हीच आठवण कायम ठेऊन पुढे विष्णुदास भावे यांच्या जन्मदिनी मराठी रंगभूमी दिन साजरा केला जाऊ लागला. मराठी नाटकांच्या सांस्कृतिक परंपरेला, त्यातील अभूतपूर्व योगदानाला आणि नाट्यकलेचा विकास घडवून आणणाऱ्या महान कलाकारांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्याचा हा दिवस असतो.
साहित्य, चित्रे, संगीत, अभिनय, नृत्य अशा अनेक कलांचा एकत्रित मेळ असणारी कलाकृती म्हणजे रंगभूमी. म्हणूनच रंगदेवतेची अविरत सेवा करणाऱ्या सर्व थोर कलाकारांना आजच्या दिवशी अभिवादन केले जाते. या दिवशी विविध ठिकाणी नाट्य महोत्सवांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये विविध पारंपरिक, आधुनिक तसेच प्रायोगिक नाटके सादर केली जातात. त्याशिवाय, रंगभूमीवर अपार योगदान देणाऱ्या कलाकारांना पुरस्काराने गौरवले जाते. आज मराठी रंगभूमी दिनानिमित्त डोंबिवली नाट्य कट्टासह अनेक ठिकाणी मराठी रंगभूमी दिवस साजरा करण्यात आला.
पहिल्या मराठी नाटकाच्या स्मरणार्थ 1943 साली या क्षेत्रातील सर्व नामवंत कलाकारांनी एकत्र येऊन, सांगली येथे 5 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत शताब्दी महोत्सव साजरा केला. या संमेलनाचे अध्यक्ष वि.दा.सावरकर हे होते. याच दिवशी नाट्यविद्येच्या संवर्धनासाठी अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती स्थापन करण्यात आली. यावेळी सर्व नाट्य रसिकांच्या साक्षीने सांगली येथे समितीने ठराव करून हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्ह्णून घोषित करण्यात आला. (हेही वाचा: Ashok Saraf, Rohini Hattangadi यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर)
मराठी रंगभूमीचा इतिहास 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झाला. गोविंद बल्लाळ देवल, बाल गंधर्व, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांसारख्या कलाकारांनी मराठी रंगभूमीला असामान्य उंचीवर नेले. तत्कालीन समाजातील विविध विषयांना हात घालून त्यावर प्रकाश टाकणारी अनेक नाटके रंगमंचावर आली. आताही मागील काही काळात रंगभूमीवर पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, मनोरंजनपर, रहस्यमय असे वेगवेगळे विषय हाताळले जाऊ लागले आहेत. काही बड्या कंपन्यांच्या पुढाकाराने अनेक नवीन मराठी नाटके तसेच जुन्या नाटकाचे रिमेक गाजत आहेत. अशाप्रकारे ही मराठी नाटकाची परंपरा दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे.