Coronavirus: कोरोनाच्या विळख्यातून कसे रहाल सुरक्षित? बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडून नागरिकांना मोलाचा सल्ला
कोरोना व्हायरसची लागण झाल्याने जगभरात जवळपास 7 हजार लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर, 1 लाख 70 हजारांहून अधिक लोकांना याची लागण झाल्याची माहिती समोर आली.
कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्याने जगभरात जवळपास 7 हजार लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर, 1 लाख 70 हजारांहून अधिक लोकांना याची लागण झाल्याची माहिती समोर आली. चीन येथील वुहान शहरात जन्मलेल्या कोरोना व्हायरसने भारतातही धडक दिली आहे. यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळल्यामुळे राज्यात भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. तसेच नागरिकांनी स्वताची कशी काळजी घ्यावी. याबाबत महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री, राजेश टोपे (Rajesh Tope), राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ट्वीट करत लोकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले होते. यात बॉलिवूडचे दिग्गज कलाकार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी उडी घेतली आहे. तसेच कोरोनाच्या विळख्यातून सुरक्षित राहण्यासाठी त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांना मोलाचा सल्ला दिला आहे.
करोना विषाणूमुळे जगभरातील अनेक शहरे बंद करण्याची वेळ आली आहे. हवेमार्फत पसरणाऱ्या या संसर्गजन्य रोगाला थांबवण्यासाठी अनेक युरोपीय देशांनी संपूर्ण शहरेच लॉक डाऊन केली आहे. अनेक सार्वजनिक सेवा बंद करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चीनमधील वुहानमधून सुरु झालेला करोनाचा प्रादुर्भाव आता 110 पेक्षा अधिक देशांमध्ये पसरला आहे. यात भारताचाही समावेश आहे. या प्राणघातक व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी व्हिडिओच्या माध्यमातून मोलाचा सल्ला दिला आहे. अमिताभ यांचा हा व्हिडीओ भारतीय रेल्वे प्रशासनाने जनजागृतीसाठी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हे देखील वाचा- कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे सांगत एका कर्मचाऱ्याने मिळवली ऑफिसमधून सुट्टी; खोटेपणा सिद्ध झाल्यानंतर 3 महिन्यासाठी गेला तुरुंगात
अमिताभ बच्चन यांचा सल्ला-
1) एकदा वापरलेला टिश्यू पेपर पुन्हा वापरु नका. टिश्यू पेपरचा वापर केल्यानंतर त्याला बंद झाकणाच्या कचरापेटीत टाका.
2) डोळे, नाक आणि तोंडाला सतत हात लावू नका.
3) आपल्या हातांना वेळोवेळी साबणाने स्वच्छ धुवा.
4) गरज नसताना घराबाहेर पडू नका.
5) जर खोकला, सर्दी किंवा ताप असल्याचे जाणवत असेल तर लगेचच डॉक्टरांकडे उपचारासाठी जा. व इतरांपासून अंतर ठेवून राहा. जेणेकरुन तुमच्या आजारांची लागण इतरांना होणार नाही.
6) अधिक माहितीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या 011 23978046 किंवा 1075 या क्रमांकावर संपर्क साधा.
पाहा व्हिडिओ-
देशभरातील लोक सध्या करोन व्हायरसच्या दहशतीमुळे त्रस्त आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर अमिताभ बच्चन यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागले आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या खास टिप्ससाठी बिग बींचे आभारदेखील मानले आहेत.