Vivek Oberoi News: विवेक ओबेरॉय याला 1.55 कोटी रुपयांना गंडा, एकास अटक

संजय शहा असे आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केल्याचे समजते. काही महिन्यांपूर्वी हे फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आले होते.

Vivek Oberoi | (Photo Credit: Facebook)

अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) याची तब्बल 1.55 कोटी रुपयांची फसवणूक केले प्रकरणी एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. संजय शहा असे आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केल्याचे समजते. काही महिन्यांपूर्वी हे फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आले होते. तेव्हापासून पोलीस आरोपींचा शोध घेत होते. या प्रकरणात तिघांवर दाखल असलेल्या गुन्ह्यापैकी एका संशयीत आरोपीसअटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे पुढील तपासाला गती मिळू शकणार आहे.

आरोपींनी अभिनेत्याची भेट घेत त्याला चित्रपट निर्मिती करण्याचे सांगत गुंतवणूक करण्यास सांगितले. पैशांची गुंतवणूक झाल्यावर मात्र आरोपींनी प्रत्यक्षात तो पैसा चित्रपट निर्मितीसाठी वापरण्याऐवजी चक्क स्वत:च्या फायद्यासाठी वापरला, असा आरोप आहे.

अभिनेता विवेक ओबेरॉय याने एंटरटेनमेंट कंपनी आणि एका चित्रपटाच्या निर्मितीसाठी आरोपींच्या सांगण्यावरुन 1.55 कोटी रुपये गुंतवले. या गुंतवणुकीतून मोठा आर्थिक फायदा होणार असल्याचे सांगण्यासही आरोपी विसरले नाहीत. अभिनेत्याने विश्वस ठेवत पैशांची गुंतवणूक केली खरी. मात्र, पुढे त्याची फसवणूक झाली.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अभिनेता ओबेरॉय याने मुंबई येथील एमआयडीसी पोलीस ठाणे गाठत 21 जुलै 2023 रोजी फसवणुकीची तक्रार दिली. प्राप्त तक्रारीवरुन भादंसं कलम 34, 409, 419 आणि 420 अन्वये संजय शहा, नंदिता शाह, राधिका नंदा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी संजय शाह याला अटक करण्यात आली आहे.

विवेक ओबेरॉय हा बॉलिवुडमधील नामांकीत अभिनेता आहे. कंपनी, रोड, साथिया, दम, डरना मना है, मस्ती, युवा, क्यूँ हो गया ना, किसना, काल, ईवाने हुए पागल, होम डिलिव्हरी डिझास्टर, प्यारे मोहन, ओंकारा, नक्ष, शाऊटआउट अॅट लोखंडवाला, फूल एन फायनल, मिशन इस्तांबुल यांसह इतरही अनेक चित्रपटांतून काम केले आहे. अलिकडेच आलेला मोदी हा त्याचा चित्रपट जोरदार आपटला होता.