सुशांत सिंह राजपूत प्रकरणी CBI चौकशीची गरज नाही- गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई पोलिस या प्रकरणाला हाताळण्यात पूर्णपणे सक्षम आहे. बॉलिवूडमधील मतभेदांशिवाय ते अन्य बाजूंनी देखील या घटनेचा तपास करत आहेत.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येनंतर 'नेपोटिजम' आणि बॉलिवूडमधील गढूळ वातावरण समोर आले. यामुळे सुशांतच्या या आत्महत्येची कसून चौकशी व्हावी आणि यामागे जे लोक कारणीभूत आहेत त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्याच्या चाहत्यांकडून होत होती. त्यासाठी CBI चौकशीची (CBI Inquiry) मागणी देखील होत होती. तसेच त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) ने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना ट्विटच्या माध्यमातूनही ही विनंती केली होती. यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी मिड डे शी बोलताना सांगितले की, सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी CBI चौकशीची गरज नाही आणि मुंबई पोलिस कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यास सक्षम आहे.
मिळालेल्या रिपोर्टनुसार, अनिल देशमुख यांनी सांगितले आहे की,"सोशल मिडियावर सुरु असलेल्या मोहिमेबाबत त्यांना पूर्ण कल्पना आहे. मुंबई पोलिस या प्रकरणाला हाताळण्यात पूर्णपणे सक्षम आहे. बॉलिवूडमधील मतभेदांशिवाय ते अन्य बाजूंनी देखील या घटनेचा तपास करत आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या तपासात कोणत्याही प्रकारचे कारस्थान असल्याचे समोर आलेले नाही. त्यामुळे एकदा तपास पूर्ण झाला की संपूर्ण रिपोर्ट सर्वांसमोर आणण्यात येईल."
मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणात आतापर्यंत 36 लोकांची चौकशी केली आहे. इतकच नव्हे तर सुशांत डिप्रेशन मध्ये असल्या कारणाने ज्या मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार घेत होता त्यांचीही चौकशी केली आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी बिहारच्या पूर्व संसद पप्पू यादव यांनी सुद्धा अमित शाह यांच्याकडे पत्रातून केली होती.