The Kerala Story: 'द केरळ स्टोरी' वरून वाद; चित्रपटातील दावे सिद्ध करणाऱ्याला मुस्लिम संघटनेकडून 1 कोटीचे बक्षीस जाहीर
केरळ स्टोरी चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हिंदू मुलींचे कथित ब्रेनवॉश, धर्मांतर आणि नंतर इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेद्वारे भरती करून अफगाणिस्तान आणि सीरियासारख्या ठिकाणी पाठवले जात असल्याचे दाखवले आहे.
'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या चित्रपटावरून सुरू झालेला वाद आता वाढत चालला आहे. 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी आक्षेप घेतला होता. ते म्हणाले की, ही तुमच्या केरळची गोष्ट असू शकते, पण ती आमच्या केरळची गोष्ट नाही. आता ‘द केरळ स्टोरी' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये करण्यात आलेल्या दाव्यांवरून गदारोळ निर्माण झाला आहे.
चित्रपट प्रदर्शित होण्याआधी मुस्लिम युथ लीग या संघटनेच्या केरळ राज्य समितीने चित्रपटात दाखवण्यात आलेले दावे, केलेले आरोप सिद्ध करणाऱ्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस देणार असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, अभिनेता आणि वकील सी शुक्कूर यांनीही चित्रपटातील दावे फेटाळून लावले आणि म्हटले की, 32 हजारांऐवजी अवघ्या 32 महिलांची नावे आणि पत्ते देऊन या महिला आयएसमध्ये सामील झाल्याचे कोणी सिद्ध केले, तर ते त्याला 11 लाखांचे बक्षीस देतील.
चित्रपटाच्या रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये दावा करण्यात आला आहे की, केरळमधील 32,000 महिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि इस्लामिक स्टेट (IS) मध्ये सामील झाल्या. या चित्रपटावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. वृत्तानुसार, मुस्लिम यूथ लीगच्या केरळ राज्य समितीने म्हटले आहे की, 4 मे रोजी केरळच्या प्रत्येक जिल्ह्यात संकलन केंद्रे उघडली जातील आणि जो कोणी चित्रपटातील आरोप सिद्ध करेल त्याला 1 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल. या संकलन केंद्रांमध्ये कोणीही तपशील टाकू शकतो.
समितीच्या पोस्टरमध्ये लिहिले आहे की, '32,000 केरळी लोकांनी धर्मांतर करून सीरियात पलायन केल्याचे आरोप सिद्ध करा. आव्हान स्वीकारा आणि पुरावे सादर करा.’ याशिवाय, केरळ अभिनेता आणि वकील सी शुक्कूर यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, चित्रपटाचा ट्रेलर 32,000 महिलांचे धर्मांतर आणि इस्लामिक स्टेटमध्ये सामील होण्याबद्दल बोलतो. यापैकी 32 महिलांचे पुरावे कोणी आणल्यास त्याला 11 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. ते पुढे म्हणाले की, 'लव्ह जिहाद' प्रकरणाबाबत कोणताही पुरावा नसताना एखाद्या समाजाला आणि राज्याला दोष देणे थांबवले पाहिजे.
यापूर्वी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावर टीका केली होती. केरळला बदनाम करण्यासाठी आणि जातीय आधारावर राज्याचे विभाजन करण्यासाठी हा चित्रपट बनवण्यात आल्याचे विजयन म्हणाले होते. विजयन म्हणाले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे खोटे बोलणे, कोणत्याही क्षेत्राला सांप्रदायिक म्हणून लेबल करणे आणि लोकांमध्ये फूट पाडण्याचा परवाना नाही. (हेही वाचा: ‘द केरळ स्टोरी’चा अस्वस्थ करणारा ट्रेलर प्रदर्शित, सत्य घटनेवर चित्रपट असल्याचा दावा)
दरम्यान, केरळ स्टोरी चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हिंदू मुलींचे कथित ब्रेनवॉश, धर्मांतर आणि नंतर इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेद्वारे भरती करून अफगाणिस्तान आणि सीरियासारख्या ठिकाणी पाठवले जात असल्याचे दाखवले आहे. ट्रेलरनुसार 32,000 हिंदू मुलींचे धर्मांतर करून त्यांना आयएसच्या तळांवर नेण्यात आले आहे.