पुणे: 9 ते 16 जानेवारी 2020 दरम्यान रंगणार Pune International Film Festival चा सोहळा; जाणून घ्या डीटेल्स

दिनांक 9 ते 16 जानेवारी 2020 रोजी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे

PIFF (संग्रहित - संपादित प्रतिमा)

PIFF: भारताला फार मोठ्या आणि महत्वाच्या चित्रपट महोत्सवांची परंपरा आहे. नुकताच मुंबई आणि गोवा इथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडला. आता पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने होणारा 18 वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (PIFF) सुरु होत आहे. दिनांक 9 ते 16 जानेवारी 2020 रोजी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा चित्रपट मोहत्सव भारतातील महत्वाच्या महोत्सवांपैकी एक मानला जातो. देशविदेशातील उत्कृष्ट चित्रपट पाहण्याची संधी या महोत्सावात मिळते. 2020 मधील हा महोत्सव, महाराष्ट्र राज्य आणि एफटीआयआय (FTII) ला 60 वर्षे पूर्ण होत असल्याने या दोन्ही गोष्टींवर आधारीत असणार आहे.

चित्रपटांबरोबरच विविध कार्यशाळा, चर्चासत्रे आणि प्रदर्शन यांचाही समावेश महोत्सवात असेल, अशी माहिती महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी दिली. महोत्सवाचे उद्घाटन 9 जानेवारी रोजी, तर सांगता 16 जानेवारी रोजी एफटीआयआयमध्ये होणार आहे. या महोत्सवात युनायटेड किंगडममधील चित्रपट ब्रिटिश कौन्सिलच्या दोन विशेष पॅकेजेससह, ‘कंट्री फोकस सेक्शन’ मध्ये दाखवले जातील. रेट्रो सेक्शनमध्ये हृषिकेश मुखर्जी यांचे चित्रपट दाखवण्यात येणार आहे. तर पोस्टर प्रदर्शनामध्ये महाराष्ट्राची उत्क्रांती व प्रगती दाखवण्यात येईल.

महोत्सवात अनेक चित्रपट विभाग असणार आहेत ज्यात ओपनिंग फिल्म, पारितोषिक विभाग, जागतिक स्पर्धा, मराठी स्पर्धा, एमआयटीएसएफटी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी स्पर्धा, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था लघुपट स्पर्धा, जागतिक चित्रपट, देश-केंद्र-कला व संस्कृती आणि बाफ्टा शॉर्ट्स यांचा समावेश असेल. (हेही वाचा: 'बिग बॉस मराठी 2' ची अतरंगी दुनिया ते 'अग्गंबाई सासूबाई' मधील सासूसुनेचं विलक्षण नातं, हे आहेत 2019 मधील Top 10 मराठी शो)

या महोत्सवातील चित्रपट पाहाण्यासाठी नोंदणी प्रक्रियेची माहिती www.piffindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 10 डिसेंबरपासून सुरू होईल, तसेच लवकरच चित्रपटांचे वेळापत्रक जाहीर होईल. पुण्यातील सिटी प्राईड कोथरूड, सिटी प्राईड सातारा रस्ता, सिटी प्राईड मंगला आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) या चित्रपटगृहांमध्ये हे चित्रपट पाहू शकता.