सोनू सूदने आपला शब्द पाळला; गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर सुरु होणार पुण्यातील Warrior Aaji शांताबाई पवार यांचे ट्रेनिंग सेंटर
अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने त्यांना इतर विविध उद्योग करण्यास भाग पाडले गेले.
कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग व त्यामुळे लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन (Lockdown) मुळे आर्थिकदृष्ट्या अनेक संसारांची वाताहत झाली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने त्यांना इतर विविध उद्योग करण्यास भाग पाडले गेले. अशात लॉक डाऊन दरम्यान, पुण्यातील रस्त्यावर लाठीच्या सहाय्याने आपले करतब दाखवणाऱ्या 85 वर्षाच्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. रस्त्यावर काठीच्या सहाय्याने आपले कसब दाखवणाऱ्या या शांताबाई पवार आजी, एकेकाळी बॉलिवूड इंडस्ट्रीचा एक भाग होत्या. हा व्हिडिओ समोर आल्यावर सोनू सूदने (Sonu Sood) त्यांना मदतीचा हात दिला होता. सोनूने आपला शब्द पाळला असून आता लवकरच आजीचे ट्रेनिंग सेंटर सुरु होणार आहे.
लॉक डाऊनमध्ये चार पैसे कमावण्यासाठी शांताबाई पुण्यातील रस्त्यावर आपले लाठीचे कसब दाखवत होत्या. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी त्यांना मदत देऊ केली होती. व्हिडिओ समोर येताच सोनू सूदने त्यांच्यासमोर मदतीचा हात पुढे केला. शांताबाई या देशातील महिलांना स्व रक्षणाचे प्रशिक्षण देऊ शकतात, असा सोनू सूदचा विश्वास होता, म्हणून शांताबाई यांच्याबरोबर संयुक्तपणे प्रशिक्षण सेंटर उघडण्याचे त्याने आश्वासन दिले होते. आता गणेशोत्सवाचा मुहूर्तावर हे ट्रेनिंग सेंटर सुरु होणार आहे.
24 जुलै रोजी सोनू सूदने ट्वीट करत विचारणा केली होती की. ‘कृपया या आजींचा तपशील मिळू शकेल का? या आजींच्या सोबत मला एक प्रशिक्षण शाळा उघडायची आहे, जिथे त्या आपल्या देशातील महिलांना काही आत्म-संरक्षणाचे धडे देऊ शकतील.’
आता ‘निर्मिती’ संस्थेने ट्विटरवर शांताबाई पवार यांच्यासह फोटो शेअर करुन यासंदर्भात माहिती दिली. ट्वीटमध्ये ते म्हणतात. ‘आज निर्मिती परिवारातील सदस्यांनी #Warrior_aaji यांची भेट घेतली. शब्द दिल्याप्रमाणे त्यांचे क्लास सुरू करण्याचे स्वप्न ‘निर्मिती फाऊंडेशन’ येणाऱ्या बावीस ऑगस्ट ला सत्यात उतरवत आहे. सोनू सूद यांची मोलाची मदत मिळाली असून लवकरच आजीचे हक्काचे व्यासपीठ त्यांना मिळणार आहे.’ (हेही वाचा: शांताबाई पवार यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून 1 लाख रुपयांची मदत; रस्त्यावर पोटासाठी करायच्या कसरत)
दरम्यान, शांताबाई पवार यांनी वयाच्या आठव्या वर्षी लाठ्याकाठ्यांचा खेळ (ढालपट्टा) खेळण्यास सुरुवात केली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रितेश देशमुखनेही आजींशी संपर्क साधला होता. तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट घेत एक लाखांचा धनादेश आणि नऊवारी साडी देऊन आजींचा सन्मान केला होता.