Sandalwood Drug Case: अभिनेता विवेक ओबेरॉयचा मेहुणा Aditya Alva ला सँडलवुड ड्रग्ज प्रकरणात अटक; 5 महिने फरार होता
राज्य पोलिसांनी अमली पदार्थ तस्करी, पुरवठा करणारे आणि रेव्ह पार्टी करणार्या संयोजकांवर कारवाई सुरू केल्यापासून माजी मंत्री दिवंगत जीवनराज अल्वा यांचा मुलगा आदित्य अल्वा गेल्या पाच महिन्यांपासून फरार होता
बेंगळुरू मध्यवर्ती गुन्हे शाखेने बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयचा (Vivek Oberoi) मेहुणा आदित्य अल्वाला (Aditya Alva) सँडलवुड ड्रग्ज प्रकरणात (Sandalwood Drug Case) अटक केली आहे. वृत्तानुसार, अभिनेता विवेक ओबेरॉय याच्या घरावरही छापा टाकण्यात आला होता. आदित्य अल्वा याला सोमवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. मंगळवारी पोलिसांनी ही माहिती दिली. राज्य पोलिसांनी अमली पदार्थ तस्करी, पुरवठा करणारे आणि रेव्ह पार्टी करणार्या संयोजकांवर कारवाई सुरू केल्यापासून माजी मंत्री दिवंगत जीवनराज अल्वा यांचा मुलगा आदित्य अल्वा गेल्या पाच महिन्यांपासून फरार होता. मिळालेल्या गुप्त माहितीवरून सोमवारी रात्री चेन्नई येथे त्याला अटक केली.
आदित्यविरोधात 4 सप्टेंबर रोजी कॉटनपेट पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आदित्य फरार होता. आदित्यच्या नावाचा समावेश कन्नड अभिनेत्रीला ड्रग्ज देणाऱ्या 12 जणांच्या यादीत होता. या प्रकरणात कन्नड चित्रपट अभिनेत्री रागिनी द्विवेदी, संजना गलराणी, पार्टी संयोजक विरेन खन्ना, आदित्य अग्रवाल, आरटीओ लिपिक के रविशंकर, नायजेरियन नागरिक आणि इतर बर्याच जणांना अटक झाली आहे. (हेही वाचा: Sonu Sood ला मुंबई उच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलास, 13 जानेवापर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे पालिकेला निर्देश)
सह पोलिस आयुक्त संदीप पाटील यांनी आदित्य अल्वा याच्या अटकेची पुष्टी केली आहे. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपी आदित्य अल्वा याला अटक करण्यात आली आहे. त्याचा बराच काळ शोध चालू होता. आदित्यबद्दल माहिती मिळताच त्याला चेन्नई येथून अटक करण्यात आली.’
सँडलवुड ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी विवेक ओबेरॉयच्या मुंबईच्या घरी ऑक्टोबर 2020 मध्ये छापा टाकला होता. याप्रकरणी विवेकची पत्नी प्रियंका अल्वा यांना नोटीस बजावण्यात आली होती. सँडलवुड ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हेबल लेक फार्महाऊसमध्ये रेव्ह पार्ट्या आयोजित करण्यात आल्या असून त्या प्रकरणातील आरोपींमध्ये आदित्य सहभाग होता. गेल्या वर्षी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने बेंगळुरूमधून तीन जणांना मादक पदार्थांसह अटक केल्यानंतर पोलिसांनी अमली पदार्थ तस्कर आणि ग्राहकांवर कारवाई सुरू केली.