'हम दिल दे चुके सनम' नंतर 19 वर्षांनी सलमान खान आणि संजय लीला भंसाळी पुन्हा Love Story साठी एकत्र
सप्टेंबर २०१९ पासून सलमान खान संजय लीला भंसाळींच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याचा अंदाज मीडिया रिपोर्ट्समधून समोर आला आहे.
संजय लीला भंसाळी (Sanjay Leela Bhansali) आणि सलमान खान (Salman Khan) हे बॉलिवूडमधील दोन दमदार कलाकार 'हम दिल दे चुके सनम' (Hum Dil De Chuke Sanam) चित्रपटानंतर पुन्हा 19 वर्षांनी एकत्र येणार आहे. एका रोमॅंटिक सिनेमासाठी सलमान खान पुन्हा संजय लीला भन्साळींसोबत काम करणार आहे. संजय लीला भंसाळी दिग्दर्शित या आगामी सिनेमात सलमान खान मुख्य अभिनेता आणि निर्माता अशा भूमिकेत असेल. सलमान सोबत कोण अभिनेत्री असेल? याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांमध्ये आहे. मात्र लवकरच मुख्य अभिनेत्री आणि इतर कलाकारांची नावं समोर येतील.
'पद्मावत' पूर्वीच सलमान खान आणि संजय लीला भंसाळी यांच्यामध्ये चित्रपटाची बोलणी सुरु होती. मात्र आता अखेर या बातमीला दुजोरा मिळाला आहे. मुंबई मिररने ही बातमी प्रकाशित केली असून प्रसिद्ध सिने समीक्षक तरण आदर्श यांनी देखील या बातमीला दुजोरा दिला आहे. सध्या सलमान खान 'भारत' सिनेमाच्या शूटिंगमध्ये आहे. त्यानंतर 'दबंग ३' चं चित्रीकरण पूर्ण केल्यानंतर संजय लीला भन्साळींच्या रोमँटिक सिनेमाला सुरुवात करणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे भन्साळींचा सिनेमा सप्टेंबर 2019 रोजी शूटिंगसाठी सज्ज असेल असे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. पुढील वर्षी म्हणजे 2020 मध्ये हा सिनेमा रिलीज होईल.
संजय लीला भन्साळींच्या आगामी सिनेमामध्ये संगीत दिगदर्शनाची बाजू देखील खुद्द भंसाळी सांभाळणार आहेत. त्यामुळे एकूणच या सिनेमाबद्दल बॉलीवूडकरांमध्ये, सलमानच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता असेल.