IPL Auction 2025 Live

RIP Siddique: प्रसिद्ध मल्याळम दिग्दर्शक सिद्दीकी इस्माईल यांचे निधन; वयाच्या 63 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सोमवार, 7 ऑगस्ट रोजी दुपारी, सिद्दीकी यांना हृदयविकाराचा झटका आला.

सिद्दीकी इस्माईल

प्रसिद्ध मल्याळम दिग्दर्शक सिद्दीकी इस्माईल यांचे मंगळवारी, 8 ऑगस्ट रोजी वयाच्या 63 व्या वर्षी निधन झाले. यकृताच्या आजारामुळे त्यांना गेल्या महिन्यात कोची येथील अमृता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवार, 7 ऑगस्ट रोजी दुपारी, सिद्दीकी यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांना एक्स्ट्राकॉर्पोरल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन (ECMO) सपोर्टवर ठेवण्यात आले. मात्र अनेक प्रयत्न करूनही त्यांचा जीव वाचवण्यात यश आले नाही. सिद्दीकी इस्माईल यांचे पार्थिव कडवंथरा येथील राजीव गांधी इनडोअर स्टेडियममध्ये 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 11.30 या वेळेत ठेवण्यात येणार आहे. नंतर ते त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येईल, जेणेकरून लोकांना श्रद्धांजली वाहता येईल. त्यानंतर बुधवारी सायंकाळी 6 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सिद्दीकी यांच्या पश्चात पत्नी सजिता आणि त्यांच्या तीन मुली- सुमाया, सारा आणि सुकून असा परिवार आहे. (हेही वाचा: Gummadi Vittal Rao Passes Away: तेलंगणातील कवी गुम्माडी विठ्ठल राव उर्फ गदर यांचे निधन; वयाच्या 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)