सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला बलात्कार आणि हत्येच्या धमक्या; पोस्ट करत सायबर पोलिसांकडे मागितली मदत (View Post)
ही बाब ट्रोलिंग पर्यंत मर्यादीत न राहता तिला बलात्कार आणि हत्येच्या धमक्या येऊ लागल्या.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येनंतर त्याची कथित गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल (Troll) करण्यात आले. ही बाब ट्रोलिंग पर्यंत मर्यादीत न राहता तिला बलात्कार (Rape) आणि हत्येच्या (Murder) धमक्या येऊ लागल्या. गेल्या अनेक दिवसांपासून या नकारात्मक परिस्थितीला तोंड देणाऱ्या रिया चक्रवर्ती हिने आता मौन सोडले आहे. तसंच तिने सायबर क्राईम विभागाकडे (Cyber Crime Department) याबद्दल तक्रार दाखल करत मदतीची मागणी केली आहे. रियाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित येणाऱ्या धमक्यांबद्दल माहिती दिली. "अनेक आरोप होऊनही मी गप्प होते. पण आता खूप झाले, असे तिनो पोस्टमध्ये म्हटले आहे.
रियाने इंस्टाग्रामवर एका मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत पोस्ट केली आहे. हा मेसेजचा स्क्रीनशॉट मन्नू राऊत नावाच्या एका मुलीचा आहे. रियाने पोस्टमध्ये लिहिले, "तुम्ही मला स्वार्थी बोललात मी शांत राहिले. तुम्ही मला खूनी बोललात मी शांत राहिले. माझ्यावर वाईट कमेंट्स केल्या गेल्या तरीही मी शांत राहिले. पण मी शांत राहिल्यामुळे जर मी आत्महत्या नाही केली तर तुम्ही माझा बलात्कार करुन हत्या कराल? असे वक्तव्य तुम्ही कसे करु शकता. तुम्ही केलेल्या वक्तव्याची तुम्हाला गंभीरता नाही. कायद्याने हा गुन्हा आहे. मी पुन्हा एकदा सांगते, कोणालाही अशा प्रकारचा त्रास होऊ नये."
Rhea Chakraborty Post:
यानंतर रियाने सायबर क्राईम विभागाकडे मदत मागितली आहे. सायबर क्राईम हेल्पलाईन, सायबर क्राईम इंडिया यांना टॅग करत रियाने लिहिले की, "कृपया यावर योग्य ती कारवाई करा. आता हे खूप झाले आहे." (सुशांत सिंह राजपूत याच्या निधनावर रिया चक्रवर्तीची पहिली प्रतिक्रिया; पाहा काय म्हणाली?)
14 जून रोजी सुशांत सिंह राजपूत याने वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर रियावर सोशल मीडिया माध्यमातून विविध आरोप करण्यात आले. दरम्यान 14 जुलै रोजी सुशांतच्या निधनाला एक महिना पूर्ण झाल्यावर रियाने त्याच्यासाठी भावूक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर आता या धमक्यांवर तिने मौन सोडले आहे.