Reliance-Disney Merger: रिलायन्स आणि डिस्ने यांच्या संयुक्त उपक्रमाची घोषणा; तयार होणार देशातील सर्वात मोठा OTT प्लॅटफॉर्म?

नीता अंबानी या उपक्रमाच्या चेअरपर्सन असतील, तर उदय शंकर हे उपाध्यक्ष असतील.

Reliance Industries Limited, Walt Disney (Photo Credits: X/@RIL_Updates, Wikimedia Commons)

Reliance-Disney Merger: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL), व्हायाकॉम18 (Viacom18) आणि वॉल्ट डिस्ने (Walt Disney) कंपनी यांनी संयुक्त उपक्रम (JV) च्या यशस्वी निर्मितीची घोषणा केली आहे. व्हायाकॉम18 मिडिया आणि जिओसिनेमा (JioCinema) व्यवसायांचे स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Star India Private Limited) मध्ये विलीनीकरणास मुंबईतील राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (NCLT) आणि भारतीय स्पर्धा आयोगासह नियामक प्राधिकरणांनी मान्यता दिली आहे. या संयुक्त उपक्रमात रिलायन्स 11,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या विलीनीकरणाच्या पूर्ततेनंतर, या उपक्रमाचे मूल्य अंदाजे 70,352 कोटी रुपये होईल.

अहवालानुसार, रिलायन्सकडे याची 16.34 टक्के, याकॉम18कडे 46.82 टक्के आणि डिस्नेकडे 36.84 टक्के अशी हिस्सेदारी असेल. नीता अंबानी या उपक्रमाच्या चेअरपर्सन असतील, तर उदय शंकर हे उपाध्यक्ष असतील. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले, ‘या संयुक्त उपक्रमाच्या निर्मितीमुळे, भारतीय मीडिया आणि मनोरंजन उद्योग परिवर्तनाच्या युगात प्रवेश करत आहे. आमचे सर्जनशील कौशल्य आणि डिस्नेशी असलेले संबंध, तसेच भारतीय ग्राहकांबद्दलची आमची अतुलनीय समज भारतीय दर्शकांसाठी परवडणाऱ्या किमतीत उत्तम कंटेंट निवड सुनिश्चित करेल.’

या विलीनीकरणानंतर, जिओसिनेमा आणि डिस्ने + हॉटस्टार हे एक मोठे ओटीटी प्लॅटफॉर्म असेल. मार्च 2024 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षासाठी अंदाजे 26,000 कोटी प्रोफॉर्मा एकत्रित कमाईसह हा उपक्रम भारतातील सर्वात मोठी मीडिया आणि मनोरंजन कंपनी असेल. अहवालानुसार, रिलायन्स जिओ डिस्ने + हॉटस्टार ॲपद्वारे आयपीएल, आयएसएल, प्रो कबड्डी इत्यादी सर्व क्रीडा स्पर्धांचे प्रसारण करेल. त्याच वेळी, सर्व वेब सिरीज, टीव्ही मालिका आणि चित्रपट इत्यादी जिओसिनेमाद्वारे प्रवाहित केले जातील. (हेही वाचा: Shaktimaan Teaser: तब्बल 19 वर्षांनी परततोय शक्तीमान; मुकेश खन्ना यांनी शेअर केली पहिली झलक, पहा व्हिडिओ)

अहवालानुसार, डिस्ने + हॉटस्टारकडे स्पोर्ट्स इव्हेंट्सच्या लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी उत्तम पायाभूत सुविधा आहेत. हे पाहता कंपनीला हा प्लॅटफॉर्म फक्त स्पोर्ट्स इव्हेंटसाठी वापरायचा आहे. अनेक वर्षांपासून डिस्ने + हॉटस्टारवर थेट क्रिकेट सामने स्ट्रीम केले जात आहेत. डिस्ने + हॉटस्टारकडे अजूनही सर्व आयसीसी इव्हेंट्सचे स्ट्रीमिंग अधिकार आहेत.