Mumbai Police Summons Kangana Ranaut: अभिनेत्री कंगना रनौत व बहिण रंगोली चंदेलला मुंबई पोलिसांनी बजावला समन्स; जाणून घ्या काय आहे कारण

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अभिनेत्री कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल (Rangoli Chandel) यांना चौकशीसाठी समन्स बजावला आहे.

कंगना राणावत (Photo Credit : Twitter)

अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) अडचणींमध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अभिनेत्री कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल (Rangoli Chandel) यांना चौकशीसाठी समन्स बजावला आहे. समन्सनुसार दोघींनाही येत्या सोमवारी किंवा मंगळवारी पोलिसांसमोर हजेरी लावावी लागणार आहे. त्यांच्या विरोधात दाखल असलेल्या देशद्रोहाच्या (Sedition) गुन्ह्याबाबत हा समन्स बजावला आहे. गेल्या आठवड्यात कंगना आणि रंगोली यांच्या विरोधात धार्मिक तेढ निर्माण केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी आयपीसीचे विविध कलम 153A, 295A ए आणि 124A अंतर्गत तक्रार दाखल केली होती.

मुनव्वर अली सय्यद उर्फ साहिल नावाच्या व्यक्तीने वांद्रेच्या दंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल केली असून, असा आरोप केला आहे की ज्या प्रकारे कंगना आणि रंगोली हिंदू कलाकार आणि मुस्लिम कलाकारांबद्दल मुलाखती देत आहेत आणि ट्विट करत आहेत, यामुळे बर्‍याच लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. ज्यावर कोर्टाने सुरुवातीला हे आरोप योग्य दिसत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर वांद्रे पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला.

एएनआय ट्वीट-

आता देशद्रोहाच्या या प्रकरणात कोर्टाने पोलिसांना पुढील कारवाई व त्वरित चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांना चौकशीसाठी पोलिस स्टेशनला बोलावले आहे. सय्यद म्हणाले होते, दोन धार्मिक गटांमध्ये जातीय तणाव पसरवण्यासाठी कंगनाची बहिण रंगोलीनेही सोशल मीडियावरही आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या आहेत. (हेही वाचा: प्रिती झिंटा ने 20 वेळा केली कोरोना टेस्ट; 'मी कोविड-19 टेस्टची क्विन' म्हणत शेअर केला व्हिडिओ)

त्यांनी कंगनाच्या त्या ट्विटचा उल्लेख केला ज्यात तिने मुंबईची तुलना पाकिस्तान व्याप्त काश्मीरशी केली होती. या ट्वीटने नव्या वादाला तोंड फुटले होते व यामुळे कंगना व शिवसेना यांच्यात चांगलीच जुंपली होती. दरम्यान, नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रंगोलीचे ट्विटर हँडल एप्रिल 2020 मध्ये निलंबित करण्यात आले होते. याआधी कर्नाटकातही कंगनाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता.