Lucknow: अभिनेत्री Shilpa Shetty व तिची आई Sunanda Shetty वर कोट्यावधी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप; FIR दाखल

अभिनेत्री शिल्पा शेट्टीसोबत (Shilpa Shetty) सध्या असेच काहीसे घडत आहे. चित्रपट, रिअॅलिटी शो आणि आपल्या जबरदस्त लूकमुळे नेहमी चर्चेत असणारी शिल्पा शेट्टी आता पोलीस आणि कोर्ट-कचेऱ्यांचा सामना करीत आहे

Shilpa and Sunanda Shetty (Photo Credits: Instagram)

म्हणतात ना की, जेव्हा संकटे येतात तेव्हा ती चारही बाजूंनी येतात. अभिनेत्री शिल्पा शेट्टीसोबत (Shilpa Shetty) सध्या असेच काहीसे घडत आहे. चित्रपट, रिअॅलिटी शो आणि आपल्या जबरदस्त लूकमुळे नेहमी चर्चेत असणारी शिल्पा शेट्टी आता पोलीस आणि कोर्ट-कचेऱ्यांचा सामना करीत आहे. सर्वप्रथम शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अश्लील चित्रपट बनवून अॅप्सवर अपलोड केल्याप्रकरणी अटक केली. दुसरीकडे शिल्पाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. शिल्पा शेट्टी आणि तिची आई सुनंदा शेट्टीवर (Sunanda Shetty) आयओसिस वेलनेस सेंटरच्या (Iosis Wellness Centre) नावाने कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी शिल्पा आणि तिच्या आईविरोधात लखनौच्या हजरतगंज विभूतिखंड पोलीस ठाण्यात दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहे. फसवणूक प्रकरणी शिल्पा आणि तिची आई सुनंदा यांची चौकशी करण्यासाठी लखनौ पोलिसांची एक टीम मुंबईत पोहोचली आहे. त्याचवेळी, दुसरी टीमही लवकरच मुंबईला पोहोचेल आणि दोघींची चौकशी करेल. शिल्पा शेट्टी आयओसिस वेलनेस सेंटर नावाची फिटनेस चेन चालवते. कंपनीचे नेतृत्व शिल्पा शेट्टी करत आहेत, तर तिची आई सुनंदा संचालक आहेत.

शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईवर आयओसिस स्लिमिंग स्कीन सलून आणि स्पा वेलनेस सेंटरची लखनौमध्ये शाखा उघडण्याच्या नावाखाली, कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. करोडो रुपये घेऊनही अभिनेत्री आणि तिच्या आईने आपली वचनबद्धता पूर्ण केली नाही. सांगितले जात आहे की शाखा उघडण्याच्या वेळी शिल्पा तेथे पोहोचली नाही किंवा तिच्या कंपनीच्या लोकांनी कोणतीही मदत केली नाही. (हेही वाचा: Super Dancer 4 मधून शिल्पा शेट्टीचा पत्ता कट, सोनाली बेंद्रे घेणार तिची जागा?)

या प्रकरणी विभूतीखंड पोलीस ठाण्यात ओमक्से हाइट्सच्या रहिवासी ज्योत्स्ना चौहान आणि हजरतगंज पोलीस ठाण्यात रोहित वीर सिंह यांनी शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या संदर्भात, हजरतगंज पोलिसांनी दोघींना एक महिन्यापूर्वी नोटीसही पाठवली होती, परंतु दोन्ही बाजूंकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. आता विभूतीखंड पोलिसांचे पथक नोटीसचे उत्तर मिळवण्यासाठी मुंबईला पोहोचले आहे. तपासात दोघीन्च्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांना अटक होऊ शकते.