Fraud Case: लोकप्रिय टीव्ही-चित्रपट अभिनेता Mahesh Thakur ची पाच कोटींची फसवणूक; पोलिसात तक्रार दाखल
अभिनेत्याने आपल्या तक्रारीत सांगितले की, एका मालमत्तेवरून वाद झाला होता, ज्यावर न्यायालयीन कारवाई आणि कागदपत्रांच्या नावाखाली त्याची 5.43 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.
टीव्हीपासून बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारा अभिनेता महेश ठाकूर (Mahesh Thakur) सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. महेश ठाकूरबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेत्याने एका व्यक्तीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. महेशने तब्बल 5.43 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे. समोर आले आहे की, 'हम साथ-साथ है' फेम अभिनेता महेशची कोठ्यावधीची फसवणूक झाली आहे.
अभिनेत्याने 21 सप्टेंबर रोजी सकाळी आंबोली पोलीस ठाण्यात मयंक गोयल नावाच्या व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अभिनेत्याने आपल्या तक्रारीत सांगितले की, एका मालमत्तेवरून वाद झाला होता, ज्यावर न्यायालयीन कारवाई आणि कागदपत्रांच्या नावाखाली त्याची 5.43 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भादंवि कलम 420 आणि 406 नुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
महेश ठाकूर 'हम साथ साथ हैं', 'हमको दीवाना कर गये', 'थोडा प्यार थोडा मॅजिक', 'आशिकी 2', 'जय हो'सह अनेक चित्रपटांमध्ये दिसला होता. छोट्या पडद्यावर 'तू तू मैं मैं' या मालिकेने महेशने वेगळी ओळख निर्माण केली. आज महेश हे टीव्ही जगतात एक प्रसिद्ध नाव बनले आहे. छोट्या पडद्यावर महेशने 'स्वाभिमान', 'आहट', 'शरारत', 'ससुराल गेंदा फूल', 'इश्कबाज' अशा मालिकांमध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. (हेही वाचा: ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अरमान कोहलीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन केला मंजूर)
दरम्यान, याआधी बॉलीवूड अभिनेत्री रिमी सेन हिने गोरेगाव येथील एका व्यावसायिकाविरुद्ध 4.14 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात, आरोपी व्यावसायिकाने अभिनेत्रीला 28 ते 30 टक्के परतावा देण्याचे आश्वासन देऊन, एका नवीन व्यवसायाच्या माध्यमातून त्याच्या फिल्म प्रोडक्शन हाऊसमध्ये 4.14 कोटी रुपये गुंतवण्यास भाग पाडले. गुंतवणुकीनंतर, आरोपीने अभिनेत्री रिमी सेनला गुंतवलेली मूळ रक्कम किंवा तिला गुंतवणुकीच्या वेळी दिलेल्या वचनानुसार व्यवसायातील नफ्याची रक्कमही परत केली नाही.