Disha Salian Death Case: दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी होण्याची शक्यता; 12 ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी

दिशाने मुंबईसतील मालाड येथील तिच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती

Disha Salian (Photo Credits-Twitter)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूच्या 6 दिवस आधी सुशांतची माजी मॅनेजर दिशा सॅलियन (Disha Salian) हिच्या मृत्यूची बातमी समोर आली होती. दिशाने मुंबईतील मालाड येथील तिच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. या प्रकरणी देखील सीबीआय (CBI) चौकशी व्हावी, अशी मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून होत आहे. या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) 12 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवायचे की नाही, यावर न्यायालय निर्णय देणार आहे.

दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. यात सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा सीबीआय तपास व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसंच सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सॅलियन यांच्या मृत्यूचा एकमेकांशी संबंध असल्याचेही याचिकेत म्हटले आहे.

ANI Tweet:

दरम्यान, सुशांत आणि दिशाने आत्महत्या केली असल्याचे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे. तसंच दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासाचा विस्तृत रिपोर्ट सीबीआयकडे सुपूर्त करावा, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. दिशा सॅलियन प्रकरणाची फाईल मुंबई पोलिसांनी डिलिट केली आहे किंवा ती हरवली आहे, असा आरोप केला जात आहे. (दिशा सॅलियन कडून शेवटचा कॉल मैत्रिण अंकिताला, 100 क्रमांकावर संपर्क साधल्याचा दावा खोटा: मुंबई पोलिसांची माहिती)

याचिका दाखल करणारे विनीत धंदा (Vineet Dhanda) सुनावणीसाठी व्हिडिओद्वारे हजर राहू शकले नसल्याने जस्टिस एसए बोबडे (SA Bobde) यांच्या खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणीला आज स्थगिती दिली आहे. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करावी, असा सल्ला न्यायालयाने विनीत यांच्या वकीलाला दिला आहे.