Coronavirus in Bollywood: कपूर कुटुंब ठरतेय कोरोनाचा हॉटस्पॉट; Arjun Kapoor सह चौघांना Covid-19 ची लागण

मुंबईत ओमायक्रॉन आणि कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे शूटिंगवर परिणाम होऊ लागला आहे

अर्जुन कपूर (Photo Credits-Instagram)

देशात पुन्हा एकदा कोविड-19 (Coronavirus) आणि ओमायक्रॉनची प्रकरणे वाढत आहेत. अलीकडच्या काळात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. नुकतेच करीना कपूरलाही कोरोना झाला होता, आता बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचा (Arjun Kapoor) कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अर्जुन कपूरशिवाय रिया कपूर, करण बुलानी, अंशुला कपूर यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अशा प्रकारे कपूर कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. याआधी सप्टेंबर 2020 मध्येही अर्जुन कपूरला कोरोनाची लागण झाली होती.

अर्जुन कपूर आणि त्याची बहीण अंशुला कपूर यांनी स्वतःला क्वारंटाइन केले आहे. अर्जुन आणि अंशुला सावधगिरी बाळगत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तसेच अलीकडच्या काळात त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला स्वतःची चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. रिया कपूर आणि तिचा पती करण बुलानी यांनीही स्वतःला क्वारंटाइन केले आहे. अर्जुनची गर्लफ्रेंड मलायका अरोराचीही चाचणी झाली आहे. रिपोर्ट येण्याच्या दोनच दिवस आधी अर्जुन करिश्मा कपूरच्या घरी आयोजित ख्रिसमस पार्टीमध्ये सहभागी झाला होता.

निर्माता बोनी कपूर यांनाही अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी झाली आणि त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर हिचा आज वाढदिवस आहे. ती आज 31 वर्षांची झाली. काल रात्री हे सर्व लोक वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र आले होते. अर्जुनचे घर बीएमसीने सील केले आहे. याआधी करीना कपूर खान, अमृता अरोरा, सीमा खान, महीप कपूर आणि त्यांची मुलगी शनाया कपूर यांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. (हेही वाचा: Aaditya Thackeray यांच्याकडून मुंबईतील कोरोनापरिस्थितीबाबत आढावा बैठक; 31 डिसेंबरला सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांवर निर्बंध कायम)

दरम्यान, अभिनेता रणवीर शौरीने एक दिवसापूर्वीच खुलासा केला होता की गोव्यातील सुट्टीवरून घरी परतल्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती, ज्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मुंबईत ओमायक्रॉन आणि कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे शूटिंगवर परिणाम होऊ लागला आहे. राज्य सरकारने मुंबईत रात्रीचा कर्फ्यू जाहीर केला आहे. त्यामुळे आता कपिल शर्माने त्याचा शो एका आठवड्यासाठी थांबवला आहे.