Amitabh Bachchan यांचा ड्युप्लिकेट कोविड-19 रुग्णांचे अशाप्रकारे करतोय मनोरंजन; पहा Video
हुबेहुब बिग बीं सारखे दिसणारे शशिकांत हे कोविड-19 रुग्णांशी संवाद साधून त्यांना आनंद आणि सकारात्मक उर्जा प्रदान करत आहेत.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे ड्युप्लिकेट शशिकांत पेडवाल (Shashikant Pedwal) यांनी कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी एक अनोखे पाऊल उचलले आहे. हुबेहुब बिग बीं सारखे दिसणारे शशिकांत हे कोविड-19 रुग्णांशी संवाद साधून त्यांना आनंद आणि सकारात्मक उर्जा प्रदान करत आहेत. व्हिडिओ कॉलद्वारे कोरोना रुग्णांशी संवाद साधून त्यांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहेत. शशिकांत पेडवाल यांच्या मजेशीर आणि कॉमिक अंदाजाने रुग्णांच्या चेहऱ्यावरही हास्य खुलत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या अनोख्या प्रयत्नामुळे ते सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत.
शशिकांत हे पेशाने शिक्षक असून गेल्या 12 वर्षांपासून ते अमिताभ बच्चन यांची नक्कल करत आहेत. त्यांचा अंदाज आणि स्टाईल पाहता ते अगदी बिग बींसारखे भासतात. शशिकांत हे पुण्याचे असून ते सामाजिक कार्यातही ते अॅक्टीव्ह असतात. आता कोरोना संकटात रुग्णांना तणावमुक्त करण्यासाठी आणि आनंद मिळण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
पहा व्हिडिओ:
मीडिया रिपोर्ट्नुसार, कोरोना रुग्णांचे मनोरंजन करण्याचा त्यांचा प्रस्ताव अनेक खाजगी रुग्णालयांकडून नाकारण्यात आला. त्यानंतर त्यांनी सरकारी रुग्णालयात जाऊन कोविड रुग्णांना भेटण्याचा विचार केला. परंतु, तिथे गेल्यावर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीनेच मी रुग्णांपर्यंत पोहचू शकत होता. त्यामुळे त्यासाठी बराच वेळ लागला, असे पेडवाल यांनी सांगितले.
आता पेडवाल व्हिडिओ कॉलद्वारे कोरोना रुग्णांशी संवाद साधत आहेत. यात ते अमिताभ बच्चन यांचे डायलॉग्स, त्यांच्या कविता ऐकवून लोकांचे मनोरंजन करतात. विशेष म्हणजे केवळ दिसणंच नाही तर आवाजातही ते बिग बींची तंतोतंत नक्कल करतात. त्यामुळे खरे अमिताभ बच्चन ओळखणे लोकांना शक्य होत नाही.