पॅडमॅन, बदलापूर, अंधाधुन यांसारख्या अनेक उत्तम चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखविणारी अभिनेत्री, राधिका आपटे (Radhika Apte) आता दिग्दर्शनात आपले नशीब आजमावणार आहे. 'स्लीप वॉकर्स' (Sleepwalkers) या शॉर्ट फिल्मद्वारे ती दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तिचा मित्र गुलशन देवय्या आणि शहाना गोस्वामी मुख्य भूमिकेत असणार आहेत. ही शॉर्ट फिल्म स्वत: राधिकाने लिहिली असून, अभिषेक चौबे, हनी त्रेहान आणि ललित शर्मा हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. गुलशन अलीकडेच नेटफ्लिक्सच्या 'घोस्ट स्टोरीज' आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओची वेब सीरिज 'अॅप' मध्ये दिसला आहे.
गुलशन आणि राधिका खूप जुने आणि चांगले मित्र आहेत. या चित्रपटाबाबत गुलशन म्हणाला, 'मला सहसा शॉर्ट फिल्म किंवा वेब सिरीज सारख्या प्रकल्पांवर काम करायला आवडते. त्यात आता माझी मैत्रीण राधिका ही फिल्म दिग्दर्शित करत असल्याने मला तिला नकार देणे अशक्य होते. या चित्रपटाद्वारे मला शहाना गोस्वामीबरोबरही काम करण्याची संधी मिळेल. मला शहानाचे काम खूप आवडते.' (हेही वाचा: 'द वेडिंग गेस्ट' सिनेमातील राधिका आपटे आणि देव पटेल यांचा बोल्ड सेक्स सीन इंटरनेटवर लीक)
'स्लीप वॉकर्स'ची कथा ही आपल्या समाजात, आजूबाजूंच्या लोकांमध्ये, निसर्गामध्ये संतुलन नसल्याच्या विषयावर भाष्य करते. हा चित्रपट लवकरच प्रीमियम ऑडिटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत याशिवाय अजूनतरी काही माहिती समोर आली नाही. दरम्यान, वाह लाइफ हो तो ऐसी' या बॉलिवूड चित्रपटातून राधिकाने आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने मराठी, बंगालीसह अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केले. नेटफ्लिक्सच्या वेब सीरीजनी राधिकाला वेगळी ओळख निर्माण करून दिली.