व्हिडिओ: 'Fixer' वेब सीरिज शूटिंग सेटवर गुंडांचा हल्ला, अनेक कलाकार जखमी, थोडक्यात बचावली माही गिल
तिग्मांशु धूलिया यांनीच स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे
ठाणे (Thane ) जिल्ह्यातील कासारवडवली (Kasarvadavali) येथे वेब सीरीज 'फिक्सर' (Fixer) च्या सेटवर काही गुंडांनी जोरदार हल्ला केला. यात अभिनेता-निर्देशक तिग्मांशु धूलिया (Filmmaker-Actor Tigmanshu Dhulia) आणि बॉलिवूड अभिनेत्री माही गिल (Mahie Gill) हिच्यासोबत काही कलाकारांना माहराहण करण्यात आल्याची घटना घडली आहे. तिग्मांशु धूलिया यांनीच स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला ठाणे शहरानजिक असलेल्या कासारवडवली येथील घोडबंदर रोड परिसरातील शिपयार्ड येथे घडली. ही घटना घडली तेव्हा सेटवर अभिनेत्री माही गिल हिच्यासोबतच वेब सीरिजमध्ये काम करत असलेले तिग्मांशु धूलिया, टीवी अभिनेता शब्बीर आहलूवालिया हेसुद्धा उपस्थित होते. या प्रकरणी ठाणे पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली आहे.
दरम्यान, तिग्मांशु धुलिया यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत पाहायला मिळते की, युनिटचे लोक एका रुग्णालयाबाहेर उभे आहेत. या व्हिडिओत अभिनेत्री माही गिल आणि कॅमेरामन संतोष तुंडियाल हेसुद्धा दिसत आहे. तसेच, संतोष तुंडियाल याच्या डोक्यावर पट्टी लावलेलीही दिसत आहे. प्राप्त माहितीनुसार सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घोडबंदर येथे शुटींग सुरु झाले. दरम्यान, सायंकाळी साडे चारच्या सुमारास काही लोक सेटवर आले. त्यांनी शुटींगचे साहित्य तोडफोड करण्यास आणि काही कलाकारांनाही मारहाण केली.
तिग्मांशू धुलिया ट्विट व्हिडिओ
निर्माता साकेत साहनी यांनी आरोप केला आहे की, सेटवर तोडफोड करणारे सर्व लोक गुंड प्रवृत्तीचे होते. त्यांनी कॅमेरा तोडण्याचा प्रयत्न केला. कॅमेरामन संतोष तुंडियाल यांनी जेव्हा त्यांना रोखण्याच प्रयत्न केला तेव्हा गुंडांनी त्यांनाही मारहाण केली. सहानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंडांनी यूनिटमधील लोकांना प्रचंड मारहाण केली. तसेच, महिलांशी गैरवर्तनही केले. (हेही वाचा, शूटिंगदरम्यान विक्की कौशलचा जबर अपघात; फ्रॅक्चरसह चेहऱ्यावर पडले 13 टाके)
दरम्यान, अभिनेत्री माही गिल हिने म्हटले आहे की, ही घटना घडत असताना आपण तेथून दूर पळालो आणि स्वत:चा बचाव केला. पण, सेटवरील लोकांना काही गुंड मारत आहेत, ही घटना आपण पाहिल्याचेही माही गिल हिने सांगितल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
निर्माता साकेत साहनी यांनी म्हटले आहे की, सेटवर आलेले लोक हफ्तावसूली म्हणून काही रक्कम मागत होते. पण, शुटींगसाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची मान्यता आम्ही प्रशासनाकडून घेतली होती. पण, सेटवर आलेले लोक पैसे दिल्याशिवाय तुम्हाला शुटींग करता येणार नाही असे सांगत होते. मात्र, आम्ही त्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी मारहाण आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली.