कौतुकास्पद! कात्रज बोगद्याजवळ वृक्षांना लागलेली आग अभिनेते सयाजी शिंदे यांनी विझवली; मोठी हानी टळली (Video)
रविवारी प्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे आणि त्यांच्या तीन मित्रांनी, कात्रज बोगद्याजवळ वृक्षांना लागलेली आग विझविली
सामाजिक कार्ये, पर्यावरण याबाबत नेहमीच पुढाकार घेणाऱ्या सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांचे वृक्ष प्रेम आज पुन्हा एकदा दिसून आले. रविवारी प्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे आणि त्यांच्या तीन मित्रांनी, कात्रज बोगद्याजवळ वृक्षांना लागलेली आग विझविली. शिंदे आणि त्यांचे मित्र शनिवारी साताऱ्याला जात असताना डोंगराच्या कडेला आग लागलेली दिसली. त्या सर्वांनी गाडी थांबवून आग विझविली. शिंदे हे पर्यावरणवादी कार्यकर्ते असून वृक्षारोपण व संवर्धनावर काम करीत आहेत. सध्या सयाजी शिंदे यांच्या या कृत्याचे कौतुक होत आहे. सयाजी शिंदे यांच्या प्रसंगावधानाने वृक्षांची फार मोठी हानी टाळली गेली आहे. इतके लोक या रस्त्याने ये-जा करत होते, मात्र कोणीच ही आग विझवण्यासाठी पुढे आले नाही, याबाबत त्यांनी संतापही व्यक्त केला आहे.
याबाबत बोलताना सयाजी शिंदे म्हणाले, 'आम्ही सातार्यात जात होतो. जेव्हा आमची कार कात्रज बोगद्याजवळ पोहोचली, तेव्हा आम्हाला जवळच्या डोंगरावर आग लागलेली दिसली. या आगीमुळे झाडे नष्ट होतील या भीतीने आम्ही तातडीने कारमधून खाली उतरलो आणि आग विझविण्याचा प्रयत्न केला. जोराचा वारा असूनही आम्ही ही आग वाढण्यापासून रोखू शकलो. कदाचित सिगारेटमुळे ही आग लागली असावी असे वाटत आहे.' सध्या या गोष्टीचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा: येत्या 1 मे पर्यंत महाराष्ट्र होणार प्लास्टिक मुक्त, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निर्देशन)
तब्बल दीड तास सयाजी शिंदे व त्यांचे मित्र ही आग विझवण्याचे काम करत होते. त्यासोबत त्यांनी उद्या होळी आहे, होळीनिमित्त झाडांना नुकसान होणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहनही शिंदेनी केले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी बीड शहरात अभिनेते सयाजी शिंदे यांची संकल्पना आणि वनविभागाच्या सहकार्याने पहिल्या वृक्ष संमेलन पार पडले. यावेळी सयाजी शिंदे यांनी भविष्यातील संकट टाळण्यासाठी वृक्ष लागवड करून, संवर्धन आणि ते जतन करण्याचे आवाहन केले होते.