Aashiqui फेम अभिनेता Rahul Roy ला ब्रेन स्ट्रोक; मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु
1990 मध्ये प्रदर्शित झालेला ब्लॉकबस्टर चित्रपट ‘आशिकी’ (Aashiqui) मुळे रातोरात स्टार बनलेला अभिनेता राहुल रॉय (Rahul Roy) सध्या कारगिलमध्ये ' LAC- लिव्ह द बॅटल' (LAC – Live the Battle) या चित्रपटाचे शूटिंग करत आहे.
1990 मध्ये प्रदर्शित झालेला ब्लॉकबस्टर चित्रपट ‘आशिकी’ (Aashiqui) मुळे रातोरात स्टार बनलेला अभिनेता राहुल रॉय (Rahul Roy) सध्या कारगिलमध्ये ' LAC- लिव्ह द बॅटल' (LAC – Live the Battle) या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. यादरम्यान त्यांना ब्रेन स्ट्रोक (Brain Stroke) आला आणि सध्या त्याला मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्याची प्रकृती सध्या गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. राहुल रॉय यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.
राहुल यांचा भाऊ रोमीर सेन यांनी इंडियन एक्सप्रेस डॉट कॉमला याबाबत माहिती दिली. तसेच राहुल यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कारगिलमध्ये तीव्र हवामान परिस्थिती असल्याने, हा स्ट्रोक आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्यांना कारगिलहून श्रीनगर येथे हलवण्यात आले. नंतर मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार 54 वर्षीय अभिनेता राहुल रॉय यांना 7 दिवसांपूर्वी कारगिलमध्ये शूटिंग दरम्यान ब्रेन स्ट्रोक झाला. यानंतर 28 नोव्हेंबर रोजी त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, कोविडची परिस्थिती पाहता खबरदारी म्हणून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. राहुल रॉय यांचा कोविड अहवाल नकारात्मक आला आहे. त्यांच्या तब्येतीची चिंता करण्याची काहीच गरज नाही आणि त्यांची तब्येत सुधारत आहे.’
महेश भट्टच्या 'आशिकी' चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर राहुल रॉयने 'सपने साजन के', 'फिर तेरी कहानी याद आयी', 'जनम', 'प्यार का साया', 'जुनून', 'पहला नशा', 'गुमराह' सारख्या बर्याच चित्रपटात काम केले. मात्र 'आशिकी' सारखा सुपरहिट चित्रपट देऊनही राहुलला बॉलिवूडमध्ये खास स्थान मिळवणे शक्य झाले नाही.