Kangana Ranaut ला आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर भाष्य करणं पडलं महागात; 'या' राज्यात अभिनेत्री विरोधात तक्रार दाखल

अभिनेत्रीने अलीकडेचं आपल्या एका ट्विटमध्ये आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना अतिरेकी म्हणून संबोधलं होतं. यावरून आता ती नव्या वादात अडकली आहे.

Kangana Ranaut (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सामाजिक आणि राजकीय विषयांवर उघडपणे बोलत असते. कंगनाच्या वक्तव्यांमुळे बर्‍याचदा तिला टीका आणि वादाचा सामना करावा लागतो. आता कंगना रनौत पुन्हा एकदा नव्या वादात सापडली आहे. उत्तर कर्नाटकातील बेलगाव जिल्ह्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजधानी दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांवर केलेल्या भाष्यामुळे कंगनाविरोधात तक्रार करण्यात आली आहे. अभिनेत्रीने अलीकडेचं आपल्या एका ट्विटमध्ये आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना अतिरेकी म्हणून संबोधलं होतं. यावरून आता ती नव्या वादात अडकली आहे. कंगना रनौत ही सोशल मीडियावरील सर्वात सक्रिय अभिनेत्री आहे. ती सतत सोशल मीडियावर शेतकरी आंदोलनाबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवत असते.

कंगनाने दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा उल्लेख दहशतवादी असा केला होता. इंग्रजी वेबसाइट द हिंदूच्या वृत्तानुसार, कंगना रनौतच्या विरोधात शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणवल्याबद्दल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्याविरोधात शहर वकिल हर्षवर्धन पाटील यांनी फिर्याद दिली होती. शहर पोलिसांनी अभिनेत्रीविरोधात एफआयआर नोंदविण्यास नकार दिल्यास किंवा तिची चौकशी करण्यास नकार दिल्यास ते न्यायालयात जातील, असं हर्षवर्धन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. (वाचा - Mohan Kapur Fake Death News: मोहन कपूर यांच्या मृत्यूची बातमी खोटी, ट्वीट करत सुरक्षित आणि स्वस्थ असल्याची दिली माहिती)

हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं की, कंगना रनौत विरूद्ध कलम 153, 154, 503, 504 505- 1, 505 A, 505 B, 505-2, आणि 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या इतर बॉलिवूड स्टार्सविरूद्धही तक्रार दाखल करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

याशिवाय कंगना रनौत विरोधात दाखल केलेल्या तक्रारीचीही बेलागावी पोलिस आयुक्त के. थियागराजन यांनी पुष्टी केली आहे. यासंदर्भात बोलताना त्यांनी सांगितलं की, कंगनाविरोधात तक्रार नोंदविली गेली आहे. अद्याप एफआयआर दाखल झालेला नाही. तक्रारीच्या आधारे पुढील कारवाई करू, असं थियागराजन यांनी सांगितलं आहे.