Bhaubeej 2020 चं औचित्य साधत अमृता फडणवीस यांनी शेअर केले नवे गाणे; सर्व भावांकडे केली 'ही' एकच मागणी (View Post)

आज भाऊबीजेचे औचित्य साधत त्यांनी एक नवे गाणे सोशल मीडियावर शेअर केले आहे. तिला जगू द्या असे या गाण्याचे बोल आहेत.

Amruta Fadnavis | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या त्यांच्या गायन कौशल्याने प्रसिद्ध आहेत. आज भाऊबीजेचे औचित्य साधत त्यांनी एक नवे गाणे सोशल मीडियावर शेअर केले आहे. 'तिला जगू द्या' असे या गाण्याचे बोल आहेत. स्त्री जन्मावर भाष्य करणारे हे गाणे त्यांनी प्रत्येक भगिनींना समर्पित केले आहे. तसंच भाऊबीजेनिमित्त त्यांनी सर्व भावांना एक मागणी देखील केली आहे. (Amruta Fadnavis Tweet: लक्ष्मीपूजन निमित्त अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काय मागितले? पाहा ट्वीट)

हे गाणे शेअर करताना अमृता फडणवीस यांनी पोस्टमध्ये लिहिले की, "आज भाऊबीजेला माझ्या सर्व भावांना एकच मागणं आहे- तिला शिकू द्या. जगण्याचा हक्क तिलाही घेऊ द्या. समाज भक्कम करायचा असेल तर तिला आधी सक्षम होऊ द्या." तसंच दिवाळीच्या शुभेच्छा देत प्रत्येक भगिनीला हे गाणे त्यांनी समर्पित केले आहे.

अमृता फडणवीस ट्विट:

हे गाणे नेटकऱ्यांच्या पसंतीस पडले असून त्यावर प्रतिक्रीयांचा वर्षाव होत आहे. 5 मिनिटं 23 सेकंदाच्या या गाण्यात स्त्री जन्माचे महत्त्व पटवून दिले आहे. तसंच गाण्याच्या शेवटी अमृता फडणवीस मुलगी दिविजा सोबत व्हिडिओत झळकत आहेत. या गाण्याचे शब्द प्राजक्ता पटवर्धन यांनी लिहिले असून श्रीरंग ऊर्हेकर यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. यापूर्वी देखील अमृता फडणवीस यांची काही गाणी प्रेक्षकांसमोर आली आहेत.

दरम्यान, केवळ आपल्या गाण्यामुळेच नाहीत तर राजकीय मुद्द्यांवर भाष्य केल्यामुळेही अमृता फडणवीस चर्चेत असतात. तसंच विरोधकांवर टीका करण्यातही त्या मागे नाहीत. अलिकडेच त्यांनी शिवसेनेचा 'शवसेना' असा उल्लेख केला होता.