फनी वादळाचा फटका बसलेल्या लोकांना अमिताभ बच्चन यांचा मदतीचा हात
यामध्ये एक महत्वाचे नाव सामील आहे ते म्हणजे महानायक अमिताभ बच्चन
नुकताच देशातील काही राज्यांवर असलेला फनी वादळाचा (Cyclone Fani) धोका टळला आहे. तामिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगालमार्गे या वादळाने आता बांग्लादेशकडे कूच केले आहे. मात्र या वादळामुळे ओडिशा राज्यात फार नुकसान झाले आहे. 16 जणांचा मृत्यू, घरांचे-पिकांचे नुकसान झालेला ओडिशा पूर्ववत होण्याचा प्रयत्न करत आहे. या वादळाचा लाखो लोकांना फटका बसला आहे, त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा मार्गावर आणण्यासाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. यामध्ये एक महत्वाचे नाव सामील आहे ते म्हणजे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan).
अमिताभ बच्चन यांनी या वादळाचा फटका बसलेल्या लोकांना मदत जाहीर केली आहे. बच्चन यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. सीएम रिलीफ फंडच्या द्वारे ही मदत जनतेपर्यंत पोहोचणार आहे. यावेळी अमिताभ बच्चन यांनी एक सुंदर कविता पोस्ट केली आहे. कितीही मोठे तुफान अथवा संकट आले तरी, कोणालाही एकटे न सोडता सार्वजन त्याचा सामना करतील, अशा आशयाचे हे ट्विट आहे.
(हेही वाचा: अमिताभ बच्चन ठरले 2018-19 मध्ये सर्वाधिक कर भरणारे कलाकार)
दरम्यान यापूर्वी अनेकवेळा अमिताभ बच्चन अशाप्रकारे नैसर्गिक आपत्तींचा सामना करणाऱ्या जनतेसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. उत्तर प्रदेश येथील शेतकऱ्यांना केलेली मदत, पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांना केलेली मदत ही याची काही उदाहरणे आहेत.