Allu Arjun: अल्लू अर्जुन आणि पुष्पा चित्रपट निर्मात्यांकडून चेंगराचेंगरीतील मृत महिलेच्या कुटुंबाला 2 कोटींची मदत जाहीर
यावेळी त्यांनी पीडितेच्या कुटुंबाला 2 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
Allu Arjun: अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun)आणि 'पुष्पा' 2 (Pushpa 2)च्या निर्मात्यांनी चेंगराचेंगरीत मृत महिलेच्या कुटुंबाला 2 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. दरम्यान, तेलंगणा राज्य चित्रपट विकास महामंडळ (FDC) चे अध्यक्ष आणि प्रमुख निर्माते दिल राजू यांनी सांगितले की, गुरुवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांची त्यांनी भेट घेतली. ही भेट सरकार आणि चित्रपट उद्योग यांच्यातील संबंधांना चालना देईल. (Allu Arjun: ‘माझ्याबद्दल गैरसमज पसरविण्यात आले,अपमानित झाल्याचे वाटत आहे’; पत्रकार परिषदेत अल्लू अर्जूनचे तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि ओवैसी यांना उत्तर)
अल्लू अर्जुनचे वडील डॉक्टरांना भेटले
अल्लू अर्जुनचे वडील आणि ज्येष्ठ निर्माता अल्लू अरविंद, दिल राजू यांनी इतरांसह रुग्णालयाला भेट दिली. चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या मुलावर उपचार सुरू आहेत. अल्लू अरविंद डॉक्टरांशी बोलले, त्यांनी सांगितले की मुलगा बरा होत आहे आणि आता तो स्वतः श्वास घेऊ शकत आहे.
दोन कोटी रुपये देण्याची घोषणा
यादरम्यान अल्लू अर्जुनच्या वडिलांनी अल्लू अर्जुनकडून 1 कोटी रुपये, पुष्पा प्रोडक्शन कंपनी मैत्री मूव्ही मेकर्सने 50 लाख रुपये आणि चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार यांनी 50 लाख रुपये मुलाच्या कुटुंबाला दिल्याची घोषणा केली. धनादेश मुलाच्या कुटुंबीयांना देण्याची विनंती केली. कुटुंबाच्या तक्रारीच्या आधारे, अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
4 डिसेंबर रोजी, 'पुष्पा 2' चित्रपट दाखविल्या जात असलेल्या हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली. त्यात एक 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा आठ वर्षांचा मुलगा जखमी झाला. महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुन याला पोलिसांनी 13 डिसेंबर रोजी अटक झाली.