शहीद जवानांच्या कुटुंबांना अक्षय कुमारची 5 कोटी मदत; बॉलीवूडच्या या कलाकारांनी दिला मदतीचा हात
अवघ्या काही तासांत तब्बल 7 कोटी रुपये या वेबसाईटच्या माध्यमातून जमवले गेले आहेत. यात अक्षयने 5 कोटी रुपयांची मदत केली आहे.
14 फेब्रुवारीला पुलवामा येथे भारतीय लष्करावर हल्ला (Pulwama Terror Attack) झाला. स्फोटकांनी भरलेली गाडी भारतीय जवानांच्या गाडीवर चालवण्यात आली. यामध्ये 40 पेक्षा भारतीय जवान शहीद झाले. याबाबतील देशात सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. सरकार या घटनेचा बदला घेण्यासाठी पावले उचलत आहे. मात्र या जवानाच्या कुटुंबाचे अपरिमित नुकसान झाले, ते कशानेही भरून निघणार नाही. तरी अनेकांनी या कुटुंबासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. यामध्ये बॉलीवूडमधील कलाकारही सामील आहेत. यातीलच एक महत्वाचे नाव म्हणजे, अक्षय कुमार (Akshay Kumar). अक्षय कुमारने तब्बल 5 कोटी रुपये शहीद जवानांच्या कुटुंबांना देऊ केले आहेत.
‘भारत के वीर’ या वेबसाईटद्वारे मदत करण्याचे आवाहन अक्षयने लोकांना केले होते. अवघ्या काही तासांत तब्बल 7 कोटी रुपये या वेबसाईटच्या माध्यमातून जमवले गेले आहेत. यात अक्षयने 5 कोटी रुपयांची मदत केली आहे. अक्षयने 2017 मध्ये ‘भारत के वीर’ या अॅपची सुरुवात केली. या अॅपच्या माध्यमातून तो शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी मदत करत असतो. (हेही वाचा : ‘भारत के वीर’ पोर्टलवर 7 कोटी जमा; साई संस्थानकडून 2.51 कोटी रुपयांची मदत जाहीर
अक्षयसोबतच अमिताभ बच्चन यांनी देखील आर्थिक मदत केली आहे. क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने हल्ल्यातील शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलण्याचं मान्य केले आहे. बॉलिवूड दबंग सलमान खानने त्याच्या 'बिईंग ह्यूमन' संस्थेमार्फत शहीदांच्या कुटुंबियांना मदत केली आहे. गायक-अभिनेता दिलजीत दोसांजनेही शहीद जवानांच्या पत्नींना 3 लाख रूपयांची मदत केली आहे. 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक'चित्रपटाचे निर्माते रौनी स्क्रूवाला यांनी जवानांच्या कुटुंबियांना 1 कोटी रूपयांची मदत केल्याची माहिती दिली आहे. कैलाश खेर यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान विजय कुमार मौर्य यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत केली आहे.