Bajaj Freedom 125 CNG: बजाज निर्मीत सीएनजी बाईकला बाजारात जोरदार मागणी, डिलिव्हरीसाठी ग्राहकांना करावी लागणार प्रतिक्षा

तर पुण्यात बाईकचा प्रतीक्षा कालावधी 30 ते 45 दिवसांवर पोहोचला आहे.

बजाजने Freedom 125 CNG लाँच केल्यापासून बाजारात एकच खळबळ पहायला मिळत आहे. पेट्रोल आणि सीएनजीवर धावणाऱ्या या बाईकबद्दल ग्राहकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. देशातील बाजारात या बाईकला ग्राहकांची मोठी मागणी असल्याचे पाहायला मिळतेय. फ्रीडम 125 ची किंमत 95 हजार रुपयांपासून सुरू होते आणि ही बाईक फक्त 1 हजार रुपयांच्या टोकन रकमेवर बुक केली जाऊ शकते परंतु या बाईकच्या जास्त मागणीमुळे आता ग्राहकांचा वेटिंग पिरीयड्समध्ये वाढ झाली असून ग्राहकांना आता या गाडीसाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.  (हेही वाचा - Bajaj CNG Bike Freedom 125: बजाजने लाँच केली जगातील पहिली सीएनजी बाईक फ्रीडम 125; जाणून घ्या किंमत व फीचर्स)

सध्या कंपनीने देशभरात आपली बुकिंग सुरू केली असून यासोबतच या बाईकचा प्रतीक्षा कालावधीही वाढला आहे. ही बाईक सादर होऊन फक्त काही दिवस झालेत. मुंबईत या बाईकसाठी जवळपास 30 दिवसांचा प्रतीक्षा कालावधी आहे. तर पुण्यात बाईकचा प्रतीक्षा कालावधी 30 ते 45 दिवसांवर पोहोचला असून गुजरातमध्ये 45 दिवस ते तीन महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी पोहोचला आहे.

नवीन फ्रीडममध्ये 125CC सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे 9.5 PS पॉवर आणि 9.7 Nm टॉर्क जनरेट करते. यात 5 स्पीड गिअरबॉक्सची सुविधा आहे. 125CC मध्ये हे एकमेव इंजिन आहे जे CNG+ पेट्रोलवर काम करते. इंजिनला अशा प्रकारे ट्यून केले गेले आहे की ते सर्व प्रकारच्या हवामानात चांगली कामगिरी करू शकते. बजाज फ्रीडम 125 मध्ये फक्त 2 किलोचा CNG सिलेंडर आहे आणि तो पूर्ण टाकीवर 200 किलोमीटर चालेल.