अमेरिकेमध्ये TikTok, WeChat वर बंदी; US President Donald Trump प्रशासनाकडून व्यवहार बंद करण्याला 45 दिवसांची मुदत

भारतामध्ये यापूर्वीच टिक टॉक, वी चॅट सह 50 पेक्षा अधिक अ‍ॅप्सवर त्यांच्या क्लोन अ‍ॅपवर सुरक्षेच्या काराणास्तव बंदी घालण्यात आली आहे.

President Donald Trump | (Photo Credits: AFP)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी TikTok आणि WeChat सारख्या चायनीज अ‍ॅप्स वर बंदी घालण्याच्या executive orders वर आज स्वाक्षर्‍या केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था Reuters च्या रिपोर्ट्सनुसार, चीनी अ‍ॅपमुळे अमेरिकेमध्ये 'सुरक्षा' धोक्यात आल्याचं सांगत त्यांनी ही कारवाई केली आहे. त्यानुसार पुढील 45 दिवसांत TikTok अ‍ॅपची मालकी कंपनी बाईटडान्स (ByteDance)आणि (WeChat)वीचॅट यांच्यासोबत आता अमेरिकेमध्ये कोणतेही व्यवहार होऊ शकत नाहीत.

अमेरिकेच्या सिनेटमध्ये गुरूवार (5 ऑगस्ट) दिवशी सरकारी उपकरणांमधून टिकटॉक काढून टाकण्यासाठी मतदान घेण्यात आले होते. व्हाईट हाऊसनेही टिकटॉक हे सुरक्षित नसल्याचं म्हणत त्याच्यावर कारवाई करणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व आहे तिथे हा ठराव मंजुर झाला आहे. आता हा ठराव डेमोक्रॅट्सचं वर्चस्व असणार्‍या House of Representatives समोर जाणार आहे.

सध्या अमेरिकेमध्ये मायक्रोसॉफ्ट ही कंपनी टिक टॉक अ‍ॅप विकत घेण्याच्या शर्यतीमध्ये असल्याचं वृत्त देखील समोर आलं आहे. दरम्यान ट्रम्प प्रशासनाने दिलेल्या 45 दिवसांच्या मुदतीमध्ये तो व्यवहार होऊ शकतो. युएसए मध्ये टिक टॉक सोबतच आता वीचॅट हा मेसेजिंग अ‍ॅपसोबत देखील व्यवहार बंद करण्याचा निर्णय झाला आहे.

भारतामध्ये यापूर्वीच टिक टॉक, वी चॅट सह 50 पेक्षा अधिक अ‍ॅप्सवर त्यांच्या क्लोन अ‍ॅपवर सुरक्षेच्या काराणास्तव बंदी घालण्यात आली आहे.