जी-7 बैठकीत पीएम नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; काश्मीर प्रश्नाबाबत अमेरिकेची माघार
यामध्ये बोलताना पीएम मोदी म्हणाले, ‘पाकिस्तानसोबत आमचे जे काही मुद्दे आहेत ते द्विपक्षीय आहेत. ते सोडवण्यासाठी आम्हाला इतर कोणत्याही तिसऱ्या देशाची गरज नाही. आम्ही एकमेकांशी चर्चा करून हे मुद्दे सोडवू
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सध्या जी 7 शिखर बैठकीसाठी (G7 Summit) फ्रांसच्या दौऱ्यावर आहेत. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते कारण यामध्ये पीएम मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची भेट होणार होती. ठरल्या वेळेत ही भेट पार पडली. यामध्ये दोन्ही नेत्यांची अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा झाली. यामध्ये बोलताना पीएम मोदी म्हणाले, ‘पाकिस्तानसोबत आमचे जे काही मुद्दे आहेत ते द्विपक्षीय आहेत. ते सोडवण्यासाठी आम्हाला इतर कोणत्याही तिसऱ्या देशाची गरज नाही. आम्ही एकमेकांशी चर्चा करून हे मुद्दे सोडवू.’
एएनआय ट्विट -
याबाबत ट्रम्प म्हणाले की, ‘काश्मीरच्या मुद्यावर आम्ही पंतप्रधान मोदींशी बोललो. सध्या तिथे सर्व काही ठीक असल्याचे त्यांनी सांगितले. मला खात्री आहे की, ते या परिसरासाठी लवकरच काही चांगला निर्णय घेतील.’ आता काश्मीर मुद्द्यामधून अमेरिकेने माघार घेतली आहे. या भेटीमध्ये नरेंद्र मोदी यांनी अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. तिसऱ्या देशाने भारत-पाकमध्ये हस्तक्षेप करू नये, दोन्ही देशांमध्ये गरिबी, रोजगारी अशा समस्या आहेत त्या आम्ही दोघे मिळून सोडवू. दोन्ही देशांना हवे असेल तर दोघे एकत्र विकासाच्या देशेकडे वाटचाल करतील. या गोष्टी मोदींनी माध्यमांसमोर मांडल्या. (हेही वाचा: भारताशी पंगा घेणे पाकिस्तानला नडले; खर्च टाळण्यासाठी चहा-बिस्कीटांवर बंदी, नोकर भरती थांबली)
याशिवाय, अमेरिका आणि चीन यांच्यामधील ट्रेड वॉरमुळे इतर देशांना मंदीच्या झळा पोहचत आहेत. याबद्दलही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. अनेक अमेरिकी कंपन्या चीनमधून भारतात येऊ पाहत आहेत. त्यादृष्टीने मोदी आणि ट्रम्प यांच्यामधील आजची चर्चा ही भविष्यकाळातील रोजगाराची नांदी असावी असे म्हटले जात आहे.