26/11 Mumbai Terror Attack: दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात भारताला अमेरिकेचा पूर्णपणे पाठिंबा- डोनाल्ड ट्रम्प

मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 10 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Photo Credit: Getty Images)

दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात अमेरिका (America) भारतासोबत उभी राहील असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सांगितले. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याला (Terror Attack) 10 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ट्रम्प यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

26 नोव्हेंबर, 2008 रोजी पाकिस्तानच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. त्यात 166 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. त्यात अमेरिकेच्या 6 नागरिकांचाही समावेश होता. म्हणूनच "मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, अमेरिकेने भारतीय नागरिकांच्या न्यायाच्या लढ्यात त्यांच्या पाठीशी उभे राहावे. आपण कधीच दहशतवाद्यांचा विजय होऊ द्यायचा नाही," असे ट्विट ट्रम्प यांनी केले.

26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला 10 वर्षे पूर्ण झाल्याने अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. ते म्हणाले की, "मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण होऊनही यातील दोषींवर कारवाई कारवाई न होणे, हा पीडितांचा अपमान आहे. हल्ल्याचे सुत्रधार हाफिज सईद आणि जाकीउर रहमान लखवी यांना शिक्षा देणे ही पाकिस्तानची जबाबदारी आहे." त्याचबरोबर हल्ल्यातील दोषींना पकडण्यासाठी 50 लाख डॉलर म्हणजेच 35 कोटी रुपयांचे बक्षिस जाहिर करण्यात आले आहे.