Shocking: फ्रांसच्या चर्चमध्ये 3.30 लाख लहान मुलांवर पाद्री आणि स्टाफकडून लैंगिक अत्याचार; पिडीतांमध्ये 80 टक्के पुरुषांचा समावेश

या हॉटलाइनवर 6,500 लोकांचे फोन आले. यामध्ये काही पिडीत होते तर काही ज्यांच्यावर अत्याचार झाले अशा लोकांना ओळखत होते

Church | प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: IANS)

उच्चभ्रू देशांपैकी एक असलेल्या फ्रान्समधून (France) लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबत (Child Abuse) एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. फ्रान्सच्या कॅथोलिक चर्चांबाबत तयार करण्यात आलेल्या या अहवालात, गेल्या 70 वर्षांत तब्बल 3.30 लाख मुलांचे लैंगिक शोषण झाल्याचे समोर आले आहे. यामधील दोन तृतीयांश आरोपी हे दुसरे तिसरे कोणी नसून चक्क चर्चचे पाद्री आहेत. या गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या 3,000 पेक्षा जास्त लोकांनी त्यावेळेत चर्चसोबत काम केले होते. स्वतंत्र आयोगाच्या चौकशी (Independent Commission Investigating) अहवालात ही बाब समोर आली आहे.

फ्रान्सच्या चर्चमध्ये अशा प्रकारच्या अश्लील आणि घाणेरड्या कृत्यांची गिनती होण्याची ही पहिलीच वेळ आहे. फ्रान्समधील रोमन कॅथोलिक चर्चमधील बाल लैंगिक शोषणाची चौकशी करणाऱ्या स्वतंत्र आयोगाचे अध्यक्ष जीन-मार्क सॉवे यांनी, रविवारी जर्नल डु दिमांचे या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आयोग अडीच वर्षांपासून या प्रकरणांची चौकशी करत आहे. त्याचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. अहवालानुसार, 1950 च्या दशकापासून चर्चमध्ये कार्यरत असलेले 11500 पाद्री आणि चर्चमधील इतर हजारो लोकांमधील जवळजवळ 3000 लोकांनी लहान मुलांचे लैंगिक शोषण केले होते.

सॉवे म्हणाले की, हा अंदाज वैज्ञानिक संशोधनावर आधारित आहेत व यातील 80 टक्के पिडीत पुरुष आहेत. सॉवे यांनी सांगितले की, एकूण बळींच्या संख्येमध्ये अंदाजे 2,16,000 लोक समाविष्ट आहेत जे पाद्री आणि इतर धार्मिक लोकांद्वारे लैंगिक हिंसाचाराला बळी पडले. ऑलिव्हियर सॅविग्नॅक यांनी या तपासणी अहवालात योगदान दिले आहे व त्यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की फ्रेंच समाज आणि कॅथोलिक चर्चसाठी घडलेला प्रकार भयंकर आहे. (हेही वाचा: 17 वर्षांच्या पित्याने घेतला पोटच्या 24 दिवसांच्या मुलाचा बळी; जोरात दाबले, वारंवार हवेत भिरकावून छताच्या पंख्यावर आदळले)

तपासाच्या सुरुवातीला एक हॉटलाईन सुरू करण्यात आली होती. या हॉटलाइनवर 6,500 लोकांचे फोन आले. यामध्ये काही पिडीत होते तर काही ज्यांच्यावर अत्याचार झाले अशा लोकांना ओळखत होते. सॉवेने यांनी म्हटले आहे की, चर्चने कधीही पीडितांवर विश्वास ठेवला नाही किंवा त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.