Prince Harry Autobiography Spare: लवकरच येणार प्रिन्स हॅरीचे आत्मचरित्र 'स्पेअर'; पुस्तकात Sex, Drugs सह ब्रिटीश राजघराण्याबाबत धक्कादायक खुलासे
पुस्तकात हॅरीचे बालपण, त्याचे शालेय दिवस, शाही सदस्य म्हणून त्याचे जीवन, ब्रिटीश सैन्यातील कार्यकाळ, त्याचे आई-वडील आणि भावासोबतचे नाते आणि लग्नाआधी आणि नंतर मेघनसोबतचे त्याचे नाते यांचे वर्णन आहे.
ब्रिटनचे ब्रिटीश राजघराणे (Britain Royal Family) हे जगातील सर्वात जुन्या आणि महत्वाच्या राजघराण्यापैकी एक आहे. नुकतेच राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाने जगभरातील अनेकांना मोठा धक्का बसला होता. त्याच्या आधी असाच धक्का प्रिन्स हॅरी (Prince Harry) आणि पत्नी मेगन मार्कल यांनी राजघराण्याचा त्याग केल्यावर बसला होता. राजघराण्याशी फारकत घेतल्यावर प्रिन्स हॅरीने अनेक मोठे खुलासे केले आहेत. आता त्याच्या आगामी 'स्पेअर' या पुस्तकातही (Prince Harry Autobiography Spare) काही गोष्टी समोर आल्या आहेत.
आपल्या आत्मचरित्रात प्रिन्स हॅरीने लिहिले आहे की, अफगाणिस्तानमध्ये तैनात असताना त्याने 25 दहशतवाद्यांना ठार केले होते. द टेलिग्राफच्या बातमीनुसार, प्रिन्स हॅरीने आपल्या संस्मरणात लिहिले आहे की, त्याला याचा गर्व किंवा लाज वाटत नाही. 38 वर्षीय ड्यूक ऑफ ससेक्स, प्रिन्स हॅरीने 2007-08 मध्ये ब्रिटिश रॉयल आर्मीमध्ये फॉरवर्ड एअर कंट्रोलर म्हणून काम केले होते. अल जझीराच्या वृत्तानुसार, प्रिन्स हॅरीने 2012-13 या वर्षात हेलिकॉप्टर पायलट म्हणून दहशतवादी तळांवर हल्ले केले.
नाझींच्या पोशाखाबाबत प्रिन्स हॅरीने लिहिले आहे की, जेव्हा मी हा ड्रेस परिधान केला तेव्हा विल्यम आणि केट हसले, त्यांनी माझी खिल्ली उडवली मात्र याच दोघांनी मला तो परिधान करण्यास प्रोत्साहन दिले होते. प्रिन्स हॅरीचे हे पुस्तक पुढच्या आठवड्यात (10 जानेवारी) बाजारात येणार आहे, पण गुरुवारीच या पुस्तकाची स्पॅनिश भाषेतील आवृत्ती लीक झाली. त्यानंतर मीडियामध्ये या पुस्तकाची चर्चा होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या पुस्तकात प्रिन्स हॅरीने त्याचा भाऊ प्रिन्स विल्यमसोबतचे भांडण, वडील किंग चार्ल्स आणि त्याची आई प्रिंसेस डायना यांच्याशी असलेले नाते याबद्दल महत्त्वाचे खुलासे केले आहेत.
पुस्तकात प्रिन्स हॅरीने त्याची आई आणि दिवंगत प्रिन्सेस डायना यांच्या कार अपघाताबाबत लिहिले आहे की, जेव्हा या प्रकरणाची चौकशी सुरू होती, तेव्हा दोन्ही भावांना याबाबत कोणाशीही बोलू नका असे सांगण्यात आले होते. प्रिन्स हॅरीने लिहिले की, शेवटी 'आमच्या आईच्या कारचा ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत होता, त्यामुळे हा अपघात झाला', असे गृहीत धरले गेले. परंतु प्रिन्सेस डायनाच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रिन्स हॅरी लिहितात, ‘चालक जर मद्यधुंद अवस्थेत असता तर त्याला छोट्या बोगद्यातून गाडी चालवताना कोणतीही अडचण का आली नाही?.
प्रिन्स हॅरीने त्याच्या आत्मचरित्रात म्हटले आहे की, त्याने वयाच्या 17 व्या वर्षी त्याच्यापेक्षा मोठ्या महिलेसोबत आपले कौमार्य गमावले. हॅरीने अनेक वर्षांपासून त्याच्या पहिल्या लैंगिक जोडीदाराचे नाव उघड केले नाही, परंतु कथितपणे त्या महिलेचे नाव लिझ हर्ले असे होते. प्रिन्स हॅरीने आपल्या आत्मचरित्रात गांजा, कोकेन, मॅजिक मशरूम आणि लाफिंग गॅसचाही वापर केल्याचे म्हटले आहे.
प्रिन्स हॅरीने खुलासा केला आहे की, क्वीन एलिझाबेथ (हॅरीची आजी) यांच्या निधनाची माहिती त्याला प्रसारमाध्यमांद्वारे मिळाली. हॅरीने सांगितले की कुटुंबातील कोणत्याही सदस्याने त्याला त्याची आजी क्विन एलिझाबेथच्या मृत्यूबद्दल सांगितले नाही. हॅरीची पत्नी मेगन मर्केल हिच्याबाबत ब्रिटनच्या राजघराण्यात सुरुवातीपासूनच वाद आहे. हॅरीने सांगितले की, राणी एलिझाबेथच्या मृत्यूनंतर मेगनला अंत्यसंस्कारामध्ये सामील होण्यास मनाई करण्यात आली होती. (हेही वाचा: एलोन मस्क ठरले 200 अब्ज डॉलर्स गमावणारी इतिहासातील पहिली व्यक्ती, जाणून घ्या कारण)
पुस्तकात हॅरीचे बालपण, त्याचे शालेय दिवस, शाही सदस्य म्हणून त्याचे जीवन, ब्रिटीश सैन्यातील कार्यकाळ, त्याचे आई-वडील आणि भावासोबतचे नाते आणि लग्नाआधी आणि नंतर मेघनसोबतचे त्याचे नाते यांचे वर्णन आहे. प्रिन्स हॅरीने आपल्या आत्मचरित्रात केलेल्या खुलाशांमुळे ब्रिटिश राजघराण्याची प्रतिमा मलिन होत असल्याचे दिसते.