Russia-Ukraine War: PM मोदींनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी केली 35 मिनिटे चर्चा; काही वेळेतचं करणार पुतिन यांना फोन
काही वेळात पंतप्रधान मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशीही चर्चा करणार आहेत.
Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांच्याशी चर्चा केली. भारत सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदींनी झेलेन्स्कीसोबत फोनवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 35 मिनिटे चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील परिस्थितीवर चर्चा केली. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या थेट चर्चेचे पंतप्रधानांनी कौतुक केले.
त्याचवेळी युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युक्रेन सरकारने दिलेल्या मदतीबद्दल मोदींनी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे आभार मानले. सुमीमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये पंतप्रधानांनी युक्रेन सरकारचे सतत समर्थन मागितले आहे. (वाचा - Russia-Ukraine War: फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विनंतीवरून रशियन सैन्याने युक्रेनमध्ये युद्धविराम केले घोषित)
पुतीन यांच्याशीही करणार चर्चा -
काही वेळात पंतप्रधान मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशीही चर्चा करणार आहेत. पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींशी फोनवर चर्चा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचवेळी, रशिया आणि युक्रेनमध्ये आज तिसरी फेरी होणार आहे, ज्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
विशेष म्हणजे 24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनच्या शहरांवर हल्ला केला होता. रशियाने आतापर्यंत युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त केली आहेत. युद्धामुळे लाखो युक्रेनियन लोकांनी इतर देशांमध्ये आश्रय घेतला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनीही पंतप्रधान मोदींना रशियाशी युद्धाबाबत बोलण्याची विनंती केली आहे.
युक्रेनच्या राजदूताचे मोदींना आवाहन -
रशियाच्या हल्ल्याच्या घोषणेनंतर युक्रेनच्या राजदूताने पंतप्रधान मोदींना या संपूर्ण प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले. युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या तणावात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे युक्रेनच्या राजदूताने म्हटले होते. याबाबत त्यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी त्वरित बोलण्याचे आवाहन केले.