धक्कादायक! चीन मध्ये नवजात बाळाला जन्माच्या अवघ्या 30 तासांमध्ये झाली कोरोना व्हायरस ची लागण; अर्भकावर तातडीचे उपचार सुरु

चीनच्या अधिकृत माध्यमांनी बुधवारी ही माहिती दिली. हे नवजात आतापर्यंत सर्वात संक्रमित रुग्ण आहे. या संसर्गामुळे चीनमध्ये 563 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Corona Virus Representative Image (Photo Credits: Wikimedia Commons and PTI)

चीनमधील वुहान (Wuhan) शहरात वा-याच्या वेगासारखा पसरलेला कोरोना व्हायरस (Coronavirus) दिवसेंदिवस गंभीर रुप धारण करत आहे. या व्हायरस च्या विळख्यात आता मोठ्या लोकांसह चक्क नवजात बालकही अडकले गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चीनमध्ये जन्मलेल्या नवजात बालकाला अवघ्या 30 तासांच्या आतच कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. चीनच्या अधिकृत माध्यमांनी बुधवारी ही माहिती दिली. हे नवजात आतापर्यंत सर्वात संक्रमित रुग्ण आहे. या संसर्गामुळे चीनमध्ये 563 लोकांचा मृत्यू झाला आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, नवजात बालकाला आईच्या गर्भात किंवा जन्म झाल्यानंतर लगेचच संक्रमण झाल्याची शक्यता आहे. बालकाला जन्म देण्याआधी आईचे रिपोर्ट्सही पॉझिटिव्ह आले होते. तज्ज्ञांनुसार ही घटना ‘व्हर्टिकल ट्रान्समिशन’चा प्रकार असू शकते. अशाप्रकारच्या घटनांमध्ये आईद्वारे गर्भात किंवा बाळाच्या जन्मानंतर व्हायरसची लागण होते.

हेदेखील वाचा- कोरोना व्हायरस मुळे Apple कंपनीला मोठे नुकसान

गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरस ने 563 लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. हा आकडा अजून वाढण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. तर 24,000 पेक्षा जास्त लोकांना या व्हायरस ची लागण झाली आहे.

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने मंगळवारी सांगितले की व्हायरसची लागण होणारी सर्वात वृद्ध व्यक्ती 90 वर्षांची होती. अहवालानुसार, संक्रमणामुळे मृत्यू झालेल्यांपैकी 80 टक्के रुग्णांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे. तर कोरोना व्हायरसची लागण झालेले हे नवजात बालक चीनमधील सर्वात कमी वयाची व्यक्ती ठरली आहे.

तर दुसरीकडे भारतातही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालाल्याने केरळमध्ये कोरोना व्हायरस संकट निपटण्यासाठी तेथील सरकारने राज्यावरील आणीबाणी घोषीत केली आहे. उत्तर प्रदेशमध्येही कोरोना व्हायरसचे काही रुग्ण आढळल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे 3 आणि बलरामपूर येथे एका व्यक्तीला कोरोना व्हायरसचे संक्रमण झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.