Monkey B Virus: चीनमध्ये पहिल्यांदाच मानवांमध्ये 'मंकी बी व्हायरस'ची पुष्टी; माकडामुळे संसर्ग झालेल्या पशुवैद्याचा मृत्यू 

आता चीनमध्ये उद्भवलेल्या आणखी एक विषाणूमुळे जगाची चिंता वाढली आहे. बीजिंग येथील एका पशुवैद्याला मंकी बी व्हायरसचा (Monkey B Virus) संसर्ग झाला होता

China reported first death due to Money B virus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना विषाणूची (Coronavirus) सुरुवात प्रथम चीनमध्ये (China) झाली होती, त्यानंतर या व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला. आता चीनमध्ये उद्भवलेल्या आणखी एक विषाणूमुळे जगाची चिंता वाढली आहे. बीजिंग येथील एका पशुवैद्याला मंकी बी व्हायरसचा (Monkey B Virus) संसर्ग झाला होता. मानवामध्ये अशा प्रकारचा संसर्ग होण्याचे चीनमधील हे पहिले प्रकरण आहे. मात्र आता या विषाणूमुळे पशुवैद्याचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णाच्या जवळच्या लोकांना या विषाणूचा धोका नसल्याचे सांगण्यात आले आहे. 53 वर्षांचे पशुवैद्य नॉन-ह्यूमन प्रायमेट्सवर संशोधन करणार्‍या संस्थेसाठी काम करत होते.

मार्चच्या सुरुवातीला दोन मृत माकडांना कापल्यानंतर एका महिन्यानी या पशुवैद्याला मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरु झाला. चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनचा साप्ताहिक इंग्रजी प्लॅटफॉर्म चीन सीडीसीने शनिवारी याचा खुलासा केला. नियतकालिकात असे म्हटले आहे की, पशुवैद्यकाने अनेक रुग्णालयात उपचार केले आणि अखेर 27 मे रोजी त्यांचे निधन झाले. यापूर्वी चीनमध्ये मंकी बी संसर्गाची कोणतीही गंभीर घटना उघडकीस आली नव्हती. एप्रिलमध्ये संशोधकांनी या पशुवैद्याचे Cerebrospinal Fluid घेतले होते, त्याद्वारेच मंकी बी व्हायरसची पुष्टी झाली होती.

दुसरीकडे या वैद्यांच्या निकटवर्तीयांचे नमुने व्हायरस चाचणीत नकारात्मक आढळले. हा विषाणू प्रथम 1932 मध्ये दिसून आला होता. अहवालानुसार, हा विषाणू थेट संपर्काद्वारे किंवा शारीरिक स्रावांच्या देवाणघेवाणीने पसरतो. या विषाणूचा मृत्यू दर 70 ते 80 टक्के आहे. (हेही वाचा: कोविड-19 चा दीर्घकाळ संसर्ग असणाऱ्या लोकांमध्ये आढळू शकतात 200 हून अधिक लक्षणे; Lancet च्या अभ्यासामध्ये खुलासा)

दरम्यान, चीनमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आता लसीकरण सक्तीचे केले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, मुलांनी लस घेतल्याशिवाय त्यांना शाळांमध्ये प्रवेश मिळणार नाही. याशिवाय चीनमधील अनेक शहरांमध्ये लोकांचे लसीकरण झाल्याशिवाय त्यांना रुग्णालये, सुपरमार्केट्ससारख्या सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करता येणार नाही, असेही आदेश देण्यात आले आहेत.