न्यूयॉर्कच्या Times Square च्या बिलबोर्डवरील स्क्रीनवर प्रदर्शित झाले राम मंदिराचे मॉडेल व श्री रामाचे चित्र (Watch Video)

या सोहळ्याचा आनंद देशातील तसेच परदेशातील लोकांनीही साजरा केला.

Digital billboard of Ram Mandir at Times Square. (Photo Credit: ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी राम मंदिर (Ram Mandir) निर्मितीसाठी आज अयोध्येत (Ayodhya) भूमिपूजन (Bhoomi Pujan) केले. या सोहळ्याचा आनंद देशातील तसेच परदेशातील लोकांनीही साजरा केला. अमेरिकेच्या न्यूयॉर्क (New York) मधील टाइम्स स्क्वेअर (Times Square) देखील आज भगवान रामाच्या रंगात राममय झालेला दिसला. राम मंदिराचे मॉडेल आणि श्री रामचे चित्र या प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरच्या बिलबोर्डवरील उच्च-रिझोल्यूशन एलईडी स्क्रीनवर दर्शविले गेले. यासोबतच लोकांनी ‘जय श्री राम’ च्या घोषणाही दिल्या. भूमिपूजनाचा हा ऐतिहासिक दिवस संस्मरणीय करण्यासाठी न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये खास प्रोग्राम आयोजित केला होता.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल 28 वर्षानंतर अयोध्येत दाखल झाले होते. श्री रामजन्मभूमीला भेट देणारे ते पहिले पंतप्रधान आहेत. यासह पंतप्रधानांनी अयोध्येत हनुमानगढीला भेट देण्याची ही पहिली वेळ होती. अयोध्येत पोहोचल्यानंतर पीएम मोदी हे प्रथम हनुमानगढ़ी येथे पोहोचले आणि तेथे प्रार्थना केली. यानंतर त्यांनी रामजन्मभूमी गाठली जिथून त्यांनी भूमिपूजन आणि मंदिराची पायाभरणी केली. भूमिपूजनानंतर तेथे उपस्थित मान्यवरांना त्यांनी संबोधित केले. हा क्षण देशभरात अनेक ठिकाणी साजरा करण्यात आला. अमेरिकेमध्ये विशाल अशा नॅस्डॅक स्क्रीन व्यतिरिक्त, 17,000 चौरस फूट एलईडी स्क्रीनवर 3 डी छायाचित्रे देखील प्रदर्शित केली गेली. (हेही वाचा: सुरेश रैना, बबिता फोगाटसह क्रीडापटुंनी अयोध्या राम मंदिर भूमिपूजनसाठी दिल्या शुभेच्छा; गौतम गंभीरने भारतीयांसाठी दिला 'हा' संदेश)

पहा व्हिडिओ -

अमेरिकन इंडियन पब्लिक अफेयर्स कमिटीचे अध्यक्ष, जगदीश सेवानी म्हणाले होते की, जीवनात किंवा शतकात एकदा घडणाऱ्या या गोष्टी नाहीत, तर असे प्रसंग संपूर्ण मानवजातीच्या जीवनात फक्त एकदाच येतात. त्यामुळे हा प्रसंग विशेषरित्या साजरा करण्यासाठी टाइम्स स्क्वेअरची निवड केली. दरम्यान, भूमीपूजनापूर्वी संपूर्ण अयोध्याला सजवण्यात आले होते. संपूर्ण शहर प्रकाशाहणे उजळून गेले होते. भूमिपूजनासाठी पीएम मोदी दिल्लीहून पारंपारिक धोती-कुर्ता अशा वेशात निघाले होते. पूजेच्या वेळी संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अनेक धार्मिक नेतेही त्यांच्यासमवेत उपस्थित होते.