Lyft, Deloitte Lay Off: जागतिक मंदीदरम्यान 'डेलॉइट', 'लिफ्ट'ची कर्मचारी कपातीची योजना; जाणून घ्या किती लोकांवर होणार परिणाम
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कंपनीने 13 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते. दरम्यान, अर्न्स्ट एंड यंगनेही अलीकडेच आपल्या 3,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे.
जागतिक मंदीचा (Global Recession) जगभरातील विविध क्षेत्रांवर परिणाम होत आहे. गेल्या काही काळात जगभरातील अनेक मोठ्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. यामध्ये ट्विटर, मायक्रोसॉफ्ट, मेटा, गुगल इत्यादी अनेक कंपन्यांच्या नावांचा समावेश आहे. आता ऑडिट फर्म कंपनी डेलॉइट (Deloitte) चे नाव देखील कर्मचारी कपात करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत समाविष्ट झाले आहे.
जागतिक आर्थिक सल्लागार कंपनी डेलॉइट अमेरिकेतील सुमारे 1,200 नोकऱ्या कमी करणार आहे. फायनान्शिअल टाईम्सच्या वृत्तानुसार, डेलॉइटच्या जोखीम आणि आर्थिक सल्लागार विभागातील (Risk and Financial Advisory Division) कर्मचार्यांमध्ये तीन टक्क्यांची कपात होईल.
शुक्रवारी, राइड-हेलिंग फर्म लिफ्टने (Lyft) रायडर्स आणि ड्रायव्हर्सच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी पुनर्रचनेचा भाग म्हणून संघाच्या आकारात कपात करण्याची घोषणा केली. अहवालानुसार, कंपनीच्या 4,000 कर्मचाऱ्यांपैकी 30 टक्के कर्मचाऱ्यांना याचा फटका बसू शकतो. लिफ्टचे सीईओ डेवियू रिशर म्हणाले, ‘मी या निर्णयाची जबाबदारी घेतो आणि समजून आहे की, याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल.’ (हेही वाचा: Google CEO Sundar Pichai's Package: गुगल सीईओ सुंदर पीचाई यांची चांदी; कर्मचारी कपातीदरम्यान मिळालं 1855 कोटी रुपयांचं पॅकेज)
प्रभावित झालेल्यांना किमान 10 आठवड्यांचे वेतन मिळेल. लिफ्टची नवीन कर्मचारी कपात 27 एप्रिल रोजी होणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कंपनीने 13 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते. दरम्यान, अर्न्स्ट एंड यंगनेही अलीकडेच आपल्या 3,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या एकूण संख्याबळाच्या हे प्रमाण 5 टक्के आहे. याशिवाय फेसबुकची मूळ कंपनी मेटाने 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची योजनाही बनवली आहे. त्याचप्रमाणे Accenture ने आपल्या 2.5 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली आहे.