Influence of China: जगातील तब्बल 82 देशांवर चीनचा प्रभाव; पाकिस्तान पहिल्या स्थानावर, अमेरिकेचाही समावेश

परराष्ट्र धोरण, देशांतर्गत घडामोडी, तंत्रज्ञानापासून ते अर्थव्यवस्थेपर्यंत पाकिस्तान पूर्णपणे चीनवर अवलंबून असल्याचे या अहवालात म्हटले आहे. चीन पाकिस्तानमध्ये इकॉनॉमिक कॉरिडॉर बनवत असून त्यासाठी अब्जावधी डॉलर्सचा निधी दिल्याचे या अहवालात म्हटले आहे.

China Flag (Photo Credits-Twitter)

जगातील अनेक देशांवर चीनचा (China) प्रभाव आहे व दिवसेंदिवस हा प्रभाव वाढत असताना दिसून येत आहे. या बाबतच्या एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, जगात असे 82 देश आहेत ज्यांच्यावर चीनचा सर्वाधिक प्रभाव आहे. यामध्ये पाकिस्तान हा पहिला देश आहे. रेडिओ फ्री युरोप आणि रेडिओ लिबर्टीने ही माहिती दिली आहे. अहवालानुसार, चीनवर अवलंबून राहण्याच्या बाबतीत कंबोडिया आणि सिंगापूर पाकिस्ताननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत, तर थायलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे.

दक्षिण आफ्रिका आणि पेरू या निर्देशांकात पाचव्या स्थानावर आहेत. फिलीपिन्स सातव्या तर मलेशिया दहाव्या क्रमांकावर आहे. किर्गिस्तान आणि ताजिकिस्तान या निर्देशांकात आठव्या आणि नवव्या क्रमांकावर आहेत. हे दोन्ही देश चीनच्या शिनजियांग प्रांताला लागून आहेत. अहवालानुसार, जर्मनी 19 व्या स्थानावर असून, तो युरोपातील असा पहिला देश आहे. या यादीमध्ये अमेरिका 21 व्या स्थानावर आहे. हा अहवाल तयार करताना, उच्च शिक्षण, देशांतर्गत राजकारण, आर्थिक संबंध, परराष्ट्र धोरण, लष्करी सहकार्य, मीडिया, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक संबंधांसह जगभरातील प्रभावावर लक्ष ठेवण्यासाठी संशोधन पथकाने नऊ श्रेणींवर लक्ष केंद्रित केले आहे. (हेही वाचा: कोविड-19 विषाणू मानवनिर्मित, चीनमधील वुहान लॅबमधून झाला लीक; अमेरिकन शास्त्रज्ञाचा खळबळजनक दावा)

डबलथिंक लॅबचे सह-संस्थापक आणि सीईओ मिन ह्वेन-वू यांनी रेडिओ फ्री युरोपला सांगितले की, चीनच्या प्रभावाच्या विविध पैलूंबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी डेटाबेस तयार करण्यात आला आहे. चीनच्या प्रभावाच्या विविध पैलूंबद्दल जगभरात जागरूकता वाढवणे हे या डेटाबेसचे प्रमुख उद्दिष्ट आहे. चीनकडून मोठमोठी कर्जे घेतल्याने पाकिस्तान या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

परराष्ट्र धोरण, देशांतर्गत घडामोडी, तंत्रज्ञानापासून ते अर्थव्यवस्थेपर्यंत पाकिस्तान पूर्णपणे चीनवर अवलंबून असल्याचे या अहवालात म्हटले आहे. चीन पाकिस्तानमध्ये इकॉनॉमिक कॉरिडॉर बनवत असून त्यासाठी अब्जावधी डॉलर्सचा निधी दिल्याचे या अहवालात म्हटले आहे. त्याचा परिणाम पाकिस्तानवर होत आहे. हा अहवाल दर्शवितो की भारत अशा काही मोठ्या देशांपैकी एक आहे ज्यावर चीनचा प्रभाव खूपच कमी आहे. या यादीत भारत 55 व्या क्रमांकावर आहे. या यादीत पॅराग्वे, नॉर्थ मॅसेडोनिया आणि अल्बानिया हे देश शेवटच्या स्थानावर आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement