भारतीय हवाई दलाच्या १२ विमानांचे पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ले; जैश-ए-मोहम्मदची कंट्रोल रुम उद्ध्वस्त

या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देऊ असा इशारा भारताने दिला होता. हा इशारा प्रत्यक्षात उतरताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे.

indian air force | (Photo credit: archived, edited, representative image)

भारतीय हवाई दलाच्या 12 विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश करत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांची कंट्रोल रुम उदद्ध्वस्त केली.  रात्रीच्या अंधारात पहाटे 3 वाजता ही कारवाई केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, गेल्या काही तासांपासून भारतीय हवाई दलाची (Indian Air Force) विमाने सीमारेषा  (Line of Control) ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत (पाकव्याप्त काश्मीर) घुसत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. दरम्यान, काल रात्रीपासून पाकिस्तान (Pakistan) सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय हद्दीच्या दिशेने गोळीबार आणि मोर्टार डागत आहे. भारताकडूनही पाकिस्तानच्या या नापाक हरकतींना जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. भारताकडून प्रत्युत्तर येताच पाकिस्तानने कांगावा करत भारतीय हवाई दलाची विमाने LOC पार करुन POK मध्ये घुसल्याचा आरोप केला आहे.

पाकिस्तानी लष्कराचा प्रवक्ता मेजर जनरल आसिफ गफूर यांनी हा आरोप भारतावर केला आहे. दरम्यान, पाकिस्तानी लष्कारने केलेल्या आरोपावर भारतीय लष्कराने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मेजर जनरल आसिफ गफूर यांनी मंगळवारी ट्विटरवर पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'भारतीय लष्कराने सीमारेषेचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी लष्कराने या विरोधात तत्काळ कारवाई केली. त्यानंतर भारतीय विमाने परत गेली.'

दरम्यान, याच मेजर जनरल आसिफ गफूर यांनी गेल्या शुक्रवारी म्हटले होते की, 'आम्ही युद्धाला तयार नाही आहोत. युद्ध करु इच्छित नाही. पण, दुसऱ्या एखाद्या देशाने जर आमच्यावर युद्ध लादले तर आम्ही त्याला प्रत्युत्तर द्यायला तयार आहोत.' (हेही वाचा, Pulwama Terror Attack ते Surgical Strike 2 चा घटनाक्रम,भारतीय वायुसेनेने उद्ध्वस्त केले दहशतवाद्यांचे अड्डे)

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देऊ असा इशारा भारताने दिला होता. हा इशारा प्रत्यक्षात उतरताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे.