पाकिस्तान मधील सिंध प्रांतातील मंदिरावर हल्ला; मूर्तींची करण्यात आली तोडफोड
नुकताच पाकिस्तानातील सिंध प्रांतामधील माता रानी भातियानी या मंदिरावर हल्ला करण्यात आला आहे.
Temple Vandalized In Pakistan: पाकिस्तानात राहणाऱ्या अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या हल्ल्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. नुकताच पाकिस्तानातील सिंध प्रांतामधील माता रानी भातियानी या मंदिरावर हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला कोणी केला हे अद्याप कळलेलं नाही. परंतु, मंदिरावर करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये मंदिराची तोडफोड करण्यात आली असून तिथल्या वास्तूचे बरेच नुकसान झाले आहे. यासंदर्भातील माहिती सोशल मीडियाद्वारे एका पाकिस्तानी वरिष्ठ पत्रकाराने दिली आहे. पत्रकार नायला इनायत यांनी ट्विटच्या माध्यमातून या हल्ला झालेल्या मंदिराचे फोटो शेअर केले आहेत.
आपल्याला शेअर केलेल्या फोटोंमध्ये दिसते की मंदिरातील मूर्तीवर काळा रंग टाकण्यात आला आहे. तसेच तोडफोडही करण्यात आली आहे. पत्रकार नायला इनायत यांनी फोटो शेअर करताना ट्विटरवर लिहिले की, "पाकिस्तानमध्ये आणखी एका मंदिरावर हल्ला करण्यात आला आहे. मंदिराची तोडफोड करण्यात आली असून यामध्ये अज्ञात व्यक्तींनी मंदिर आणि पवित्र ग्रंथांचे नुकसान केले आहे."
या आधी, तिथल्याच परिसरातील एका स्थानिक युवतीचे अपहरण करण्यात आले होते व नंतर जबरदस्तीने तिचे लग्न लावून देत धर्मपरिवर्तन देखील करण्यात आले.
यापूर्वी सिंध प्रांतातीलच लरकाना परिसरातील एका मंदिरावर देखील हल्ला करण्यात आला होता. काही कट्टरपंथी मुस्लिमांनी हा हल्ला केला असून उपस्थित संतप्त जमावाने मंदिराची धर्मशाळा जाळून टाकली होती. तसेच नानकाना गुरूद्वारावर देखील मुस्लिमांच्या जमावाने जोरदार दगडफेक करत हल्ला केला होता. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरला झाला होता.