Hindu Temple Vandalised in Bangladesh: बांगलादेशमध्ये हिंदूंची धार्मिकस्थळे संकटात! संत चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेनंतर 3 हिंदू मंदिरांवर हल्ला

शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर जमा झालेल्या जमावाने घोषणाबाजी केली आणि 3 हिंदू मंदिरांवर हल्ला केला, मंदिरांची तोडफोड केली आहे.

Photo Credit- X

Hindu Temple Vandalised in Bangladesh: बांगलादेशातील चितगावमध्ये शुक्रवारी नमाज अदा केल्यानंतर घोषणाबाजी करणाऱ्या जमावाने तीन हिंदू मंदिरांची तोडफोड (Bangladeshi Hindu Temple Vandalised) केल्याचे वृत्त समोर आले आहे. इस्कॉनचे (ISKCON) माजी सदस्य आणि हिंदू संत चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली. चितगावमध्ये निदर्शने आणि हिंसाचार झाला आहे. स्थानिक न्यूज पोर्टल BDNews24.com च्या वृत्तानुसार, चितगावच्या हरीश चंद्र मुनसेफ लेनमध्ये असलेल्या हिंदू मंदिरांवर शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास हल्ला झाला.

हल्लेखोरांच्या जमावाने शांतनेश्वरी मातृ मंदिर, शोनी मंदिर आणि शांतनेश्वरी कालीबारी मंदिरावर हल्ला केला. मंदिर अधिका-यांनी सांगितले की, घोषणाबाजी करत असलेल्या शेकडो लोकांच्या एका गटाने मंदिरांवर विटा आणि दगड फेकले. शोनी मंदिराच्या दरवाजांचे आणि इतर दोन मंदिरांचे नुकसान केले. कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रमुख अब्दुल करीम यांनी हल्ल्याला दुजोरा दिला असून हल्लेखोरांनी मंदिरांचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही बाजूंच्या हाणामारीत मंदिरांचे फारसे नुकसान झाले नाही. दोन्ही गटांनी एकमेकांवर विटा आणि दगडफेक केली.

शांतीनेश्वरी मंदिर व्यवस्थापन समितीचे सदस्य तपन दास यांनी सांगितले की, 'शुक्रवारी नमाज अदा केल्यानंतर शेकडो लोकांचा जमाव आला. त्यांनी हिंदुविरोधी आणि इस्कॉनविरोधी घोषणा देण्यास सुरुवात केली. जेव्हा परिस्थिती बिघडली तेव्हा सैन्याला पाचारण केले, त्यांनी कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला. दुपारपूर्वीच सर्व मंदिरांचे दरवाजे बंद करण्यात आले. मात्र, तरीही त्यांनी मंदिराच्या बाह्य भागात हल्ला केला. बांगलादेशच्या इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कृष्णा चेतना (इस्कॉन) चे माजी सदस्य, आध्यात्मिक नेते चिन्मय कृष्ण दास यांना 25 नोव्हेंबर रोजी देशद्रोहाच्या प्रकरणात अटक करण्यात आली. चितगाव न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला आहे.

चिन्मय कृष्ण दासच्या अटकेविरोधात बांगलादेशची राजधानी ढाका आणि चितगावसह अनेक ठिकाणी हिंदू समुदायाने निदर्शने सुरू केली. 30 ऑक्टोबर रोजी चितगावच्या कोतवाली पोलिस ठाण्यात चिन्मय कृष्ण दाससह 19 जणांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यावर चितगावच्या न्यू मार्केट परिसरात हिंदू समुदायाच्या रॅलीदरम्यान बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप आहे.

भारत-बांगलादेश यांच्यातील तणावात वाढ

बांगलादेशात सातत्याने होत असलेल्या हिंदुत्वविरोधी घटनांमुळे दोन दक्षिण आशियाई शेजारी राष्ट्रांमध्ये राजनैतिक वाद निर्माण झाला आहे. भारताने २९ नोव्हेंबर रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बांगलादेशमध्ये अलीकडच्या काळात द्वेषयुक्त भाषण, हिंदू समुदायाविरुद्ध हिंसाचार तसेच मंदिरांवरील हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत.