Google ने Doodle साकारत जागवल्या सर्जन, उद्योजक, लेखक शेक दीन मोहम्मद यांच्या स्मृती!
सणवार, विशेष दिवस, एखाद्या व्यक्तीला मानवंदना म्हणून गुगल अनेकदा डुडल साकारत असतं.
Google Doodle : सणवार, विशेष दिवस, एखाद्या व्यक्तीला मानवंदना म्हणून गुगल अनेकदा डुडल साकारत असतं. आता गुगलने डुडल साकारत एंग्लो इंडियन शेक दीन मोहम्मद (Sake Dean Mahomed) यांच्या स्मृती जागवल्या आहेत. शेक दीन मोहम्मद हे एक एंग्लो इंडियन (Anglo Indian) प्रवासी, सर्जन आणि उद्योजक होते. त्यांच्या भरीव कामगिरीबद्दल गुगलने डुडल साकारत त्यांना मानवंदना दिली आहे.
कोण होते शेक दीन मोहम्मद?
पश्चिमेकडील अनेक उल्लेखनीय प्रवाशांपैकी ते एक होते. त्यांनी युरोपात 'भारतीय पाककृती' आणि 'शॅम्पू' यांची सुरुवात केली. त्यांनी भारत आणि इंग्लंड या दोन देशांमध्ये सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करुन चांगले नाव कमावले. शेक ईस्ट इंडिया कंपनीचे बंगालमध्ये सैनिक होते. इंग्रजीमध्ये पुस्तक प्रकाशित करणारे ते पहिले भारतीय लेखक होते. त्यांनी इंग्लंडमध्ये एक भारतीय रेस्टॉरंटही उघडले.
1810 मध्ये त्यांनी 34 जॉर्ज स्ट्रीट, लंडनमध्ये हिंदुस्थान कॉफी हाऊसची स्थापना केली. ते आशियाई संचालित ब्रिटेनमधील पहिले भारतीय रेस्टॉरंट होते. मात्र त्यांचा हा व्यवसाय दोन वर्षात अयशस्वी ठरला. त्यानंतर मोहम्मद यांना 1812 मध्ये त्यांचे रेस्टॉरंट बंद करण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली.
त्यानंतर मोहम्मद आपल्या परिवारासह ब्रायटन शहरात स्थायिक झाले आणि समुद्रकिनारी त्यांनी 'बाथ' नावाने स्पा ओपन केले. या स्पा मध्ये 'हर्बल स्टीम बाथ'ची सुरुवात करण्यात आली. स्टीम बाथ आणि भारतीय पद्धतीने दिला जाणारा मसाज हे या स्पा चे आकर्षण ठरले. या उपचाराला त्यांनी 'शॅम्पू' असे नाव दिले. 'शॅम्पू' याचा अर्थ डोक्याची मालिश.
1851 मध्ये मोहम्मद यांचा ब्रायटन येथे मृत्यू झाला. सेंट निकोलस चर्च, ब्रायटनच्या कब्रिस्तानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.