French Wine: अंतराळातून पृथ्वीवर आलेल्या वाईनचा होत आहे लिलाव; जवळपास 75 कोटी किंमत मिळण्याची अपेक्षा, जाणून घ्या काय आहे खास

यावेळी अनेकांनी अवकाशातून पृथ्वीवर आलेल्या दारूची चव चाखली. त्यांना आढळले की अंतराळातून पृथ्वीवर आलेल्या वाइनची चव थोडी बदलली आहे.

Liquor | entational Image | (Photo Credits: Pixabay)

जगातील सर्वोत्तम गोष्टी आपल्याकडे असाव्यात अशी जवळजवळ प्रत्येकाचीच इच्छा असते, मग ते डायमंड असो, उत्तम फर्निचर असो, उत्तम पेंटिंग्ज असो किंवा उत्तम दारू (Liquor). सध्या अशाच एका स्पेशल दारूची चर्चा सर्वत्र रंगली आहे, जी लिलावात विकली जाणार आहे. या दारूबाबत खास गोष्ट म्हणजे ही दारू चक्क अंतराळातून पृथ्वीवर आलेली आहे. प्रसिद्ध लिलाव हाउस क्रिस्टी (Christie) यांनी मंगळवारी सांगितले की, ते फ्रेंच वाईनच्या (French Wine) बाटलीचा लिलाव करीत आहेत. दारूची ही बाटली पृथ्वीच्या बाहेर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर (ISS) एका वर्षापेक्षा जास्त काळासाठी ठेवली होती. या लिलावामध्ये या बाटलीला 10 दशलक्ष डॉलर्स (73.7 कोटी रुपये) मिळू शकतील अशी अपेक्षा आहे.

नोव्हेंबर 2019 मध्ये, अंतराळातील शेतीच्या संभाव्यतेचा शोध घेत असलेल्या संशोधकांमार्फत वाइनच्या 12 बाटल्या आयएसएसला पाठविल्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे द पेट्रस 2000 (The Petrus 2000) ही आहे. फ्रान्समधील वाइन टेस्टिंग तज्ञाच्या मते, 14 महिन्यांनंतर पृथ्वीवर परत आलेल्या या वाइनच्या चवमध्ये थोडा बदल झाला आहे. क्रिस्टीच्या वाइन अँड स्पिरिट विभागाचे आंतरराष्ट्रीय संचालक टिम टिप्री यांनी सांगितले की, अंतराळात ठेवलेली वाइन शून्य गुरुत्वाकर्षणाने वेगळ्या वातावरणात परिपक्व झाली आहे.

टिम टिप्री पुढे म्हणाले की, हे एक चांगले मद्य आहे, जे बराच काळ टिकू शकते. महत्वाचे म्हणजे पृथ्वीवर परत आल्यावरही याची चव उत्तम होती. 'स्पेस कार्गो अनलिमिटेड’ नावाच्या स्टार्टअप कंपनीने नोव्हेंबर 2019 मध्ये ही वाइन पृथ्वीच्या कक्षेत पाठविली. हवामान बदल आणि रोगासाठी पृथ्वीवरील झाडे अधिक मजबूत बनविणे हे यामागील कारण आहे. संशोधकांना या वाइनमध्ये होणाऱ्या बदलाला समजून घ्यायचे होते.

फ्रान्सच्या बोर्डेक्स येथे असलेल्या 'इन्स्टिट्यूट ऑफ वाईन अ‍ॅन्ड वाइन रिसर्च' येथे मार्च महिन्यात वाइन टेस्टिंगची चाचणी घेण्यात आली. यावेळी अनेकांनी अवकाशातून पृथ्वीवर आलेल्या दारूची चव चाखली. त्यांना आढळले की अंतराळातून पृथ्वीवर आलेल्या वाइनची चव थोडी बदलली आहे. त्यानंतर ती लिलावासाठी क्रिस्टीला देण्यात आली.