Flydubai Flight Diverted: 'कोड ७५००'चा हायजॅक अलर्ट अन् विमानाची 2 मिनिटांत 17000 फूट घरंगळ; कारण ऐकून सुरक्षा यंत्रणाही चक्रावल्या!

दुबईहून इस्रायलच्या तेल अवीव शहराकडे जाणाऱ्या फ्लाईदुबईच्या विमानामध्ये दोन वैमानिकांमध्ये झालेल्या तीव्र वादानंतर आणीबाणीचा इशारा देण्यात आला. यामुळे विमान सौदी अरेबियाच्या दिशेने वळवून सुरक्षित उतरवण्यात आले असून हायजॅकिंगचा संशय फेटाळण्यात आला आहे.

Photo Credit- X

दुबईहून इस्रायलमधील तेल अवीव शहराच्या दिशेने जाणाऱ्या ‘फ्लाईदुबई’च्या एका प्रवासी विमानामध्ये उड्डाणादरम्यान मोठी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. कॉकपिटमध्ये उपस्थित असलेल्या दोन वैमानिकांमध्ये झालेल्या तीव्र वादामुळे विमानाने थेट हायजॅकिंग दर्शवणारा आंतरराष्ट्रीय सुरक्षा कोड जारी केला. या गंभीर इशाऱ्यानंतर विमानात उपस्थित सुमारे १८० प्रवाशांमध्ये घबराट पसरली. खबरदारीचा उपाय म्हणून विमानाचा मार्ग बदलून ते सौदी अरेबियातील तबूक विमानतळावर सुरक्षितरीत्या उतरवण्यात आले आहे. इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी विमान अपहरण (हायजॅकिंग) झाल्याचा संशय पूर्णपणे फेटाळला असून, हा अंतर्गत वाद असल्याचे स्पष्ट केले आहे.

विमानात नेमके काय घडले?

उड्डाण ट्रॅकिंग डेटानुसार, विमानातून प्रथम सामान्य आणीबाणी दर्शवणारा ‘कोड ७७००’ (Squawk 7700) जारी करण्यात आला होता. मात्र, काही क्षणांतच विमानाचा ट्रान्सपॉन्डर कोड बदलून ‘कोड ७५००’ (Squawk 7500) करण्यात आला. नागरी विमान वाहतुकीच्या नियमांनुसार हा कोड विमानाचे अपहरण किंवा बेकायदेशीर हस्तक्षेप झाल्याचे दर्शवतो. अवघ्या दोन मिनिटांत विमानाची उंची ३४,००० फुटांवरून सुमारे १६,६०० फुटांपर्यंत खाली आली होती. वैमानिकांमधील वादाचे पर्यवसान या सिग्नलमध्ये झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

इस्रायलमध्ये सुरक्षा यंत्रणा सतर्क

विमानातून 'कोड ७५००' पाठवला जाताच इस्रायलमध्ये तातडीने सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर आल्या. इस्रायलच्या हवाई दलाने (IAF) तातडीने लढाऊ विमाने (Fighter Jets) सज्ज केली. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी संरक्षण मंत्री आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय तातडीची बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र, हे अपहरण नसून विमानातील क्रू सदस्यांमधील अंतर्गत वाद असल्याचे समजल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement