South Africa Floods: दक्षिण आफ्रिकेच्या Durban शहरात पुराचे थैमान; 300 हून अधिक लोकांचा मृत्यू
हा चिंतेचा विषय असून पावसाचा जोर कायम राहणार असून आधीच बाधित झालेल्या भागातील परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.
South Africa Floods: दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) डर्बन शहर (Durban City) आणि पूर्वेकडील क्वाझुलु-नाताल (KwaZulu-Natal) प्रांतात अतिवृष्टी आणि पुरामुळे किमान 306 लोकांचा मृत्यू झाला आहे. येत्या काही दिवसांत हे वादळ कायम राहण्याचा अंदाज आहे. अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले की, अनेक कुटुंबे बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
संततधार पावसामुळे प्रांतात महापूर आला आहे. अनेक घरे कोसळली असून इमारतींचे नुकसान झाले आहे. मोठ-मोठाले महामार्ग वाहून गेले आहेत. इथाक्विनीचे महापौर मॅकिलोसी कुंडा यांनी गुरुवारी सांगितले की, डर्बन आणि आसपासच्या इथाक्विनी महानगर क्षेत्रातील अंदाजे 5.2 करोड डॉलरचे नुकसाने झाले आहे. (हेही वाचा - Elon Musk ने सोशल मीडिया कंपनी Twitter ला विकत घेण्यासाठी दिली 41 बिलियन डॉलर्सची ऑफर)
दरम्यान, 120 शाळांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. ज्यामुळे 2.6 करोड डॉलर जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे. प्रशासनाने प्रांतातील शाळा तात्पुरत्या बंद केल्या आहेत. शिक्षण मंत्री अँजी मोशेगा यांनी सांगितले की, पुरामुळे विविध शाळांमधील किमान 18 विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहे.
मोशेगा यांनी आज दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही शोकांतिका असून यामुळे भयंकर नुकसान झाले आहे. हा चिंतेचा विषय असून पावसाचा जोर कायम राहणार असून आधीच बाधित झालेल्या भागातील परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेतील प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, प्रशासकीय पाठिंब्याअभावी डर्बनच्या रिझर्व्हायर हिल्समध्ये आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी स्टेनगनचा वापर केला. दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय संरक्षण दलाला मदत करण्यासाठी तैनात करण्यात आले आहे.