Eventbrite Layoff: इव्हेंटब्राइटने घेतला आपल्या 8 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय; भारत, स्पेनमध्ये हलवणार 30% नोकऱ्या
कंपनीने चौथ्या तिमाहीत महसुलात 20 टक्के वाढ नोंदवली आहे, यावरूनच कंपनीचा व्यवसाय जागतिक स्तरावर चांगला चालला आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो.
गेल्या अनेक महिन्यांपासून जगभरातील मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात सुरु आहे. जागतिक स्तरावर मंदी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात आता आणखी एक कंपनी मोठ्या संख्येने आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. माहितीनुसार, अमेरिकन इव्हेंट मॅनेजमेंट आणि तिकीट वेबसाइट इव्हेंटब्राइटने (Eventbrite) जाहीर केले आहे की कंपनी तिच्या एकूण कर्मचार्यांपैकी 8 टक्के लोकांना कमी करणार आहे. कंपनी जागतिक स्तरावर सेल्फ-सर्व्हिस तिकीट, विपणन आणि तंत्रज्ञानाच्या व्यवसायात आहे आणि 180 देशांमध्ये तिच्या शाखा आहेत.
इव्हेंटब्राइट इंकने मंगळवारी कर्मचारी कपातीची घोषणा केली. कंपनीने सांगितले की, तिकीट सेवा प्रदाता आर्थिक मंदीच्या चिंतेमध्ये आपला खर्च कमी करण्याचा विचार करीत आहे. इव्हेंटब्राइटने आपल्या 30 टक्के कर्मचार्यांची बदली करण्याचाही विचार केला असल्याची माहिती दिली. काही कर्मचारी अर्जेंटिना आणि अमेरिकेतून स्पेन आणि भारतात ट्रांसफर केले जाऊ शकतात. याशिवाय कंपनी आपले सर्व कस्टमर सपोर्ट आणि ऑपरेशन रोल्स अमेरिकेच्या बाहेर रिलोकेट करण्यावर काम करत आहे.
कंपनीने चौथ्या तिमाहीत महसुलात 20 टक्के वाढ नोंदवली आहे, यावरूनच कंपनीचा व्यवसाय जागतिक स्तरावर चांगला चालला आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो. याशिवाय कंपनीची तिकीट विक्री क्षमताही पूर्वीपेक्षा वाढली आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये कंपनीने 3.3 बिलिअन डॉलरची तिकीट विक्री केली आहे. (हेही वाचा: McKinsey Layoff: प्रसिद्ध मॅनेजमेंट कन्सल्टन्सी कंपनी मॅकिन्सेमध्ये होणार कर्मचारी कपात; 2,000 लोकांना कामावरून काढून टाकणार)
इव्हेंटब्राइट इंकने 2022 मधील $260.9 दशलक्षच्या तुलनेत वर्ष 2023 मध्ये $312-$330 दशलक्ष कमाईची अपेक्षा ठेवली आहे. इव्हेंटब्राइटमध्ये 31 डिसेंबरपर्यंत 881 पूर्णवेळ कामगार होते. यापैकी 508 युनायटेड स्टेट्समध्ये आणि बाकीचे इतर ठिकाणी काम करत होते.
(The above story first appeared on LatestLY on Mar 01, 2023 08:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

